मुंबई, दि. ११:- भारतीय समाजक्रांतीचे प्रणेते, थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे अभिवादन केले.
वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, महात्मा फुले यांच्या सामाजिक क्रांतीमुळेच आजच्या आधुनिक भारताचा पाया घातला गेला. सत्यशोधक चळवळ, लोकशिक्षण, महिला शिक्षण यासाठी महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी आयुष्य वेचले. शोषित-वंचितावरील अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. समाजातील अनिष्ट रूढी, प्रथांना त्यांनी कडाडून विरोध केला. ब्रिटिश राजवटीलाही त्यांनी खडे बोल सुनावले. उद्योग, व्यवसाय आणि शेतीच्या क्षेत्रांतील यशस्वी अशा कामांनी त्यांनी उद्यमशीलतेचा संदेश दिला. पुरोगामी महाराष्ट्राच्या समताधिष्ठित वाटचालीत महात्मा फुले यांचे अमूल्य असे योगदान आहे.
राज्यकारभार, जनकल्याण याबाबत महात्मा फुले यांनी घालून दिलेले धडे आजही मार्गदर्शक आहेत. त्यानुसारच आपली वाटचाल सुरू आहे. महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.