महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सातारा, दि. १२ एप्रिल : महात्मा फुले यांच्या सामाजिक क्रांतीमुळेच आजच्या आधुनिक भारताचा पाया घातला गेला. सत्यशोधक चळवळ, लोकशिक्षण, महिला शिक्षण यासाठी महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी आयुष्य वेचले. शोषित-वंचितावरील अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. समाजातील अनिष्ट रूढी, प्रथांना त्यांनी कडाडून विरोध केला. ब्रिटिश राजवटीलाही त्यांनी खडे बोल सुनावले. उद्योग, व्यवसाय आणि शेतीच्या क्षेत्रांतील यशस्वी अशा कामांनी त्यांनी उद्यमशीलतेचा संदेश दिला. पुरोगामी महाराष्ट्राच्या समताधिष्ठित वाटचालीत महात्मा फुले यांचे अमूल्य असे योगदान आहे. त्यामुळेच महात्मा फुले हे समाजसेवेसाठी जीवन समर्पित करणारे थोर महापुरुष होते, असे प्रतिपादन प्राचार्य श्रीनिवास वाळवेकर यांनी केले. पांचगणी येथील महात्मा फुले विद्यामंदिर आणि कांताबेन जे. पी. महेता ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या महात्मा फुले जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून प्राचार्य वाळवेकर बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य वाळवेकर यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना प्रा. मंगल भिवरकर म्हणाल्या, महाराष्ट्रासह देशातील समाजसुधारणेच्या चळवळीत मोलाचे योगदान देणारे, स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा जोतीराव फुले यांची जयंती. महात्मा फुले यांनी सामाजिक सुधारणांची चळवळ उभारताना उद्योग क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले आहे. महात्मा फुले यांनी एक प्रकारे सामाजिक सुधारणांची चळवळ चालवताना दुसरीकडे देश उभारणीचे ही कार्य केले. प्रास्ताविक प्रा. सौ. भारती पवार यांनी केले, प्रा. पी. एस. कदम यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. बी. पी. राऊत यांनी आभार मानले. याप्रसंगी श्रीमती आर. डी.वाडकर, श्रीमती पी. एल. गुळुंमकर, प्रा. एस. एन.गाडेकर, श्री वसावे ए. सी., श्री साळुंखे एन. बी., श्रीमती पवार एम. ए., सोनावणे के. जी., पडसरे एन. डी. व केंद्रे एस. एस., घुले नामदेवराव उपस्थित होते.