पाटण, दि. 21 : ग्रामीण भागात शैक्षणिक संस्था चालविताना किती अडचणी येतात याची आपल्याला जाणीव आहे. मात्र माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी पाटणमध्ये शैक्षणिक संस्था सुरू करून दुर्गम व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची चांगली सुविधा निर्माण करून शिक्षणाचे दालन उभे केले आहे. त्यांनी ज्ञानाची ज्योत पेटवून दिली आहे. आज या संस्थेतील भव्य सभागृहाला थोर शास्त्रज्ञ व राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव दिले ही फार मोठी गोष्ट आहे. पाटण तालुका हा विकासाचा केंद्रबिंदू असून शिक्षणाच्याबाबतीतही पाटण तालुका हा शिक्षणाचा केंद्रबिंदू ठरावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केली.येथील कोयना शिक्षण संस्थेने पाटण येथे नव्याने उभारलेल्या सर्व सोयींनीयुक्त ए. बी. जे. अब्दुल कलाम सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर होते.

यावेळी सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक, माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर, कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, उपाध्यक्ष प्रकाशराव पाटील, जनरल सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ शेलार, संस्थेचे संचालक संजीव चव्हाण, संचालिका शिलासिंग राजेमहाडीक, ऋुतुराज पाटणकर, डॉ. प्रल्हाद चव्हाण, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजाभाऊ काळे, दूध संघाचे चेअरमन सुभाषराव पवार, नगराध्यक्षा मंगल कांबळे, प्रांताधिकारी सुनील गाडे, तहसीलदार रमेश पाटील, गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.ना. नाईक-निंबाळकर पुढे म्हणाले, पाटणकर कुटुंबियांसमवेत तीन ते चार पिढीपासून आमचे चांगले संबंध आहेत. जिल्ह्यात सच्चे व्यक्तीमत्व म्हणून विक्रमसिंह पाटणकर यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी त्याकाळी पाटण तालुक्यासाठी अनेक विधायक कामे केली आहेत. आपणही समाजाचे काही तरी देणं लागतो या हेतूने त्यांनी राजकारण केले. आज पुर्नवसनाचा प्रश्न सुटलेला नाही. व्याघ्रप्रकल्प, अभयारण्य आदी प्रश्नही समोर उभे असून ते सुटणे गरजेचे आहेत. भूकंप तर पाटण तालुक्याच्या पदरीच आहे. शरद पवार साहेबांचे राजकारण हे सर्वसामान्य जनतेसाठीच आहे. अगदी लहान, सहान गोष्टींचा विकास पवार साहेबांनी केला. विक्रमसिंह पाटणकर हे राज्यातील ज्येष्ठ नेते असून त्यांच्या पाठीशी आपण रहावे, असे आवाहन करून पाटण तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले असून याचा फायदा लोकांना कसा होईल हे विक्रमसिंह पाटणकरांनी चांगलेच ओळखले आहे. त्यामुळे संस्थेत ट्युरिझमसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.अध्यक्षीय भाषणात विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, पूर्वी विद्यार्थ्यांना पत्र्याच्या शेडमध्ये शिक्षण घ्यावे लागत असल्याने पावसाळ्यात विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत होती. शिक्षकांनाही शिकविताना तारेवरची कसरत करावी लागत होती. मात्र विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करून शरदचंद्रजी पवार यांच्या माध्यमातून आपण संस्थेला जागा मिळवून देण्यापासून ते स्वमालकीच्या भव्यदिव्य इमारत उभी करण्यापर्यंत निधी मिळवून दिला. केवळ स्मारके उभी न करता शिक्षणाचे दालन आम्ही उभे केले आहे. यात संस्थेचे सर्व संचालक, शिक्षक, पालक यांचे मोठे योगदान आहे. संस्थेत आज तालुक्यासह बाहेरील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांनीही चांगले शिक्षण व विचार जोपासण्याचे काम करावे. भविष्यात चांगली पिढी निर्माण झाली पाहिजे. उच्च पदावर विद्यार्थी गेले पाहिजेत. चांगला समाज घडवण्याची जबाबदारी आपली आहे. संस्थेतील सभागृहात अब्दुल कलाम यांचे नाव दिले ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, चांगल्या शिक्षणासाठी विद्यार्थी पुणे, मुंबई येथे जात होते. मात्र आज कोयना शिक्षण संस्थेत सर्व सुविधांयुक्त शिक्षण दिले जात आहे. संस्थेतील हे सभागृह म्हणजे मेड इन पाटण असे नावारूपास येईल. या संस्थेत विद्यार्थ्यांना एमपीएससी, युपीएससीचे प्रशिक्षण मिळावे हा कोयना शिक्षण संस्थेचा संकल्प आहे. विद्यार्थ्यांनीही याचा फायदा घ्यावा व तालुक्याचा नावलौकीक वाढवावा. कोणतेही काम करताना एक दूरदृष्टी असावी. कोयना शिक्षण संस्थेनेही विकास ही दूरदृष्टी ठेवली त्यामुळेच आजचा हा दिवस आपण पहात आहे, असे त्यांनी सांगितले.जनरल सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर म्हणाले, आजचा अब्दुल कलाम सभागृहाचा उद्घाटनाचा कार्यक्रम म्हणजे कोयना परिवाराला आनंदाचा सोहळा आहे. आज संस्थेचे 20 हायस्कूल, प्राथमिक शाळा, आयटीआय, महाविद्यालय, ज्युनिअर कॉलेज असून या संस्थेत कोयना पॅटर्नच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण दिले जात आहे. तर नव्याने हॉटेल मॅनेजमेटं याचे प्रशिक्षण ही देण्यात येत आहे. संस्थेला शरदचंद्रजी पवार, विक्रमसिंह पाटणकर यांची मोलाची साथ मिळाल्याने कोयना शिक्षण संस्थेच्या भव्यदिव्य इमारती उभ्या आहेत. यात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असून याचा आपल्याला अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांनीही चांगले शिक्षण घेवून चांगले अधिकारी व्हावे हे आमचे स्वप्न आहे, असे त्यांनी सांगितले.प्रारंभी ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहाचे उद्घाटन ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा व सभागृहाचे काम केलेल्या कारागिरींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दीपक डांगे पाटील व सौ. काटे यांनी सुत्रसंचालन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पवार यांनी स्वागत केले. संस्थेचे संचालक संजीव चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमास उपनगराध्यक्ष सागर पोतदार, ऍड. अविनाश जानुगडे, दिनकरराव घाडगे, शोभा कदम, मिलन सय्यद, शंकरराव जाधव, नथुराम मोरे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, कोयना शिक्षण संस्था परिवारातील सदस्य, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































