महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : शेती व ग्रामविकासासाठी दळणवळण सुधारणा होणे गरजेचे आहे. त्यामुळे पाणंद रस्ते खुले करून रस्त्यांचे मजबुतीकरण केल्यास नागरिकांना सोयीचे ठरेल असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केले. नावडी (ता.पाटण) येथे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या पाणंद रस्त्याची सुधारणा करणे कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच शोभा पुजारी, उपसरपंच सचिन पाटील, देसाई कारखान्याचे संचालक पांडुरंग नलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सारंग पाटील म्हणाले, शेतीला लागणारी यंत्रसामग्री शेतापर्यंत नेणे, शेतकऱ्यांनी पिकविलेला माल बाजारात पोचविणे यासाठी चांगले रस्ते असणे महत्वाचे आहे. त्यासाठी आवश्यक बारमाही पाणंद रस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शासनाकडून निधी उपलब्ध होत आहे. खा.श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याने नावडी येथील पाणंद रस्त्याची सुधारणा करण्याचे काम मार्गी लागणार आहे. याचा फायदा निश्चितच शेतक-यांसह नागरिकांना होणार आहे.
कार्यक्रमास कारखान्याचे माजी संचालक मानसिंग नलवडे, बाबासो नलवडे आदिंसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.