भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त देशभरात दि. 25 ते 30 एप्रिल, 2022 या दरम्यान सर्व विभागांमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत दिनांक 26.04.2022 रोजी किसान भागीदारी, प्राथमिकता हमारी अभियानामध्ये कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव येथे शेतकरी मेळावा व कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन माननीय खासदार श्री. श्रीनिवास पाटील उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना कृषि विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांसाठीचे कृषि मंदीर व्हावे असे प्रतिपादन केले. यापुढे त्यांनी शेती करताना शेतकऱ्यांनी माती परिक्षण करुन शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने बियाणे निवड करावी तसेच किडरोगाचे नियंत्रण करुन भरघोस उत्पादन घ्यावे, मालाची साठवणुक, मुल्यवर्धन करुन शेतकऱ्यांनी स्वत: बाजारपेठ निर्मिती करावी. योग्यरित्या ब्रँडिग केल्यास योग्य बाजारभाव मिळेल व शेतकरी समृध्द होईल. बाजारपेठेचा अभ्यास करुन शेतकऱ्यांनी पिकांची निवड करावी, असे प्रतिपादन केले. याप्रसंगी आयोजित कृषि प्रदर्शनातील विविध स्टॉलला मान्यवरांनी व उपस्थित शेतकऱ्यांनी भेटी देऊन उद्योजकांशी सुसंवाद साधला. यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक प्रा. मोहन शिर्के तसेच तालुका कृषि अधिकारी, सातारा श्री. हरिश्चंद्र धुमाळ यांनी शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला. यानंतर पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त, डॉ. अंकुश परिहार यांनी पशुपालक शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्डची माहिती दिली. तसेच सहा.
आयुक्त पशुसंवर्धन डॉ. पी. के. पवार यांनी पशुसंवर्धन विभागाच्या योजनांबाबत माहिती दिली. यावेळी सरपंच ग्रामपंचायत, बोरगांव श्री. सतिश साळुंखे उपस्थित होते. यावेळी आयोजित कृषि यांत्रिकीकरण कृषि प्रदर्शनामध्ये महिंद्रा व कुबोटा ट्रॅक्टर्स यांच्या प्रतिनिधींनी ट्रॅक्टरवरील नवीन औजारांची माहिती दिली. प्रदर्शनामध्ये महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी तयार केलेल्या विविध प्रक्रियायुक्त उत्पादनांची माहिती दिली. सदर शेतकरी मेळाव्यामध्ये जिल्हयातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रगतशील शेतकरी तसेच उत्पादक कंपन्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच याप्रसंगी म. खासदार साहेबांनी कृषी विज्ञान केंद्र बोरगांव येथे पाणी फाउंडेशन चे सुरू असलेल्या प्रशिक्षणाचा आढावा घेतला व कौतुक केले. श्री. मोहन लाड यांचा शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल गौरव करण्यात आला. यावेळीसातारा जिल्हयातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. कृषि प्रदर्शनाचे व्यवस्थापन श्री. शरद काळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेश बाबर, सुत्रसंचालन श्री. सागर सकटे व आभार प्रदर्शन डॉ. कल्याण बाबर यांनी केले.