पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी कोयना नदीपात्रात बोटींगचे प्रशिक्षण
पाटण, दि 16: अतिवृष्टी व पूरपरिस्थितीच्या काळात सामना करण्यासाठी पाटण तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीकडून स्थानिकांना बोटी चालवण्याबाबत येथील कोयना नदीपात्रात प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी सुनील गाडे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सागर पोतदार यांच्यासह नगरसेवक, नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना प्रांताधिकारी सुनील गाडे म्हणाले, पाटण तालुक्यातील पर्जन्यमान तसेच कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कोयना, केरा नद्यांच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली जाते. पाटणमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरते. घरांना पाण्याचा वेढा पडल्याने अनेकजण घरातच अडकून पडतात. केरा पुलानजिक असणारा पशुवैद्यकीय दवाखाना, स्मशानभूमी परिसर, केरा पुलापासून ते जुना बसस्थानक, झेंडाचौक, धांडे पूल, नवीन बसस्थानक, कळके चाळ, रामापूर, ग्रामपंचायतीची जुनी इमारत, मार्केट यार्ड परिसर असा सर्व परिसर पुराच्या पाण्याखाली जात असतो. अशा परिस्थितीत लोकाना बाहेर काढताना प्रशासकीय यंत्रणेला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. यास्तव मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून पाटणमधील स्थानिकांना कोयनानदीत बोट चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

पावसाळ्यात अशा प्रकारे आपत्ती उद्भवल्यास या बोटीमुळे नागरीकांना बाहेर काढणे सोयीस्कर होणार आहे. यासह तहसील कार्यालयात चोवीस तास आपत्ती व्यवस्थापण कक्ष स्थापन करण्यात आला असून आपत्तीची माहिती याठिकाणी घेतली जाणार असल्याचे प्रांताधिकारी सुनील गाडे यांनी शेवटी बोलताना दिली.यावेळी पाटण येथील कोयना नदीपात्रात प्रत्यक्षपणे नगरपंचायतीचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांना बोट चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचबरोबर बोटीबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
































