लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याची निवडणूक लढवणार नाही: सत्यजितसिंह पाटणकर पाटण शुगर केन ची तयारी जोरातपत्रकार परिषदेत दिली माहिती
पाटण प्रतिनिधी : पाटण शुगर केन या नव्याने सुरू होणाऱ्या साखर कारखान्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत . पाटण विधानसभा मतदारसंघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सार्वत्रिक न्याय देण्यासाठी या नव्या साखर कारखान्याची आम्ही निर्मिती करत असून आमच्या कारखान्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून याच वर्षी त्याचा पहिला गळीत हंगाम सुरू होईल . या सार्वत्रिक बाबींचा विचार करून लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक न लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे . देसाई कारखान्याच्या नेतृत्वाने या संधीचा फायदा घेऊन निवडणुकीत वाचलेला पैसा हा ऊस उत्पादक शेतकरी , कामगारांच्या हितासाठी वापरावा व कारखान्याची सर्वतोपरी चांगली वाटचाल करावी अशा शुभेच्छा राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिल्या . यावेळी बोलताना सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले सध्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे . आपल्याही काही पदाधिकारी , कार्यकर्ते व सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या इच्छा होती की आपणही या कारखान्याची निवडणूक लढवावी . यापूर्वी आपल्याकडे ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांसाठी पर्याय नसल्याने आपण या कारखान्याची निवडणूक लढवत होतो , आता आपण आपल्या विधानसभा मतदारसंघातील ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांसाठी पर्यायी नवा पाटण शुगर केन हा साखर कारखाना उभारत आहोत युद्धपातळीवर त्याचे कामही सुरू आहे , त्यामुळे त्यांना विरोध करत बसण्यापेक्षा देसाई कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांना आता हा कारखाना प्रगतीत आणण्यासाठी अथवा स्थानिक ऊस उत्पादक कामगारांचे हित जोपासण्यासाठी आपण पुर्णपणे स्वातंत्र्य देत असल्याने आपण लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लढवणार नाही . यापूर्वीच्या निवडणुकीत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण अनेकदा पॅनल उभे केले होते हा इतिहास आहे . याशिवाय अगदी गेल्या निवडणुकीत सर्वसामान्य शेतकऱ्यांनी पॅनल टाकले तरीही तब्बल दोन हजाराहून अधिक सभासदांनी त्यांना मतदान केले होते .लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखाना उभारण्यात माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचाही सिंहाचा वाटा आहे, त्यामुळे त्यांच्या विचाराचे सभासद आजही देसाई कारखान्यात आहेत.लवकरात लवकरच पाटण शुगरकेन या कारखान्याची निर्मिती व्हावी , मतदारसंघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्पर्धात्मक ज्यादा दर मिळावा , वेळेत उसाची तोड व्हावी, स्थानिक कामगारांना , सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार, व्यवसाय उपलब्ध व्हावा यादृष्टीने आपले सार्वत्रिक प्रयत्न सुरू आहेत . आपल्या कारखान्यांमध्ये राजकीय पक्ष , गट , तट न पाहता सर्वसामान्य शेतकरी , ऊस उत्पादक, कामगारांचे सार्वत्रिक हित जोपासले जाणार आहे .
त्यामुळे देसाई कारखान्याची निवडणूक लढण्यापेक्षा या निवडणुकीच्या माध्यमातून होणारा खर्च वाचवून तो त्या मंडळींनी ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांच्या हितासाठी वापरावा यासाठीच आपण ही निवडणूक लढवत नाही . आपल्या नव्या कारखान्याच्या प्रगतीसाठी व त्यांनाही देसाई कारखान्यांच्या सार्वत्रिक प्रगतीसाठी हा निर्णय आपण घेतल्याचेही शेवटी सत्यजितसिंह पाटणकर यांनी स्पष्ट केले .