फलटण शहरात डेंग्यू रोगाचे थैमान! डेंग्यूने दुसरा बळी .
फलटण प्रतिनिधी :- मंगळवार पेठ फलटण येथील किरण राजू काकडे याचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या नेतृत्वाखाली विविध मागण्याच्या संदर्भात नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात दि . २६ सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात आला होता.
फलटण शहरात डेंग्यू रोगाने थैमान घातले असून , डेंग्यूने फलटण शहरातील दुसरा बळी घेतला आहे , तरीही प्रशासन मात्र अॅक्टिव्ह मोडवर दिसत नाही , शहराच्या ज्या भागातून तक्रारी , आंदोलन किंवा नागरिक आक्रमक होतील , त्याच भागात नगरपालिका प्रशासनाद्वारे फवारणी व स्वच्छता केली जात असल्याचे चित्र दिसत आहे . शहरात कित्येक ठिकाणी पाण्याची डबके साठलेले आहेत , पण याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. सध्या झोपडपट्टी भागात फॉग मशीनद्वारे फवारणी केली पाहिजे , मात्र तेच भाग वंचित ठेवले जात आहेत .
मंगळवार पेठ फलटण येथील किरण राजू काकडे यास डेंग्यू आजाराची लागण झाली होती. त्याच्यावर फलटण येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू होते. किरणची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यास पुणे येथे पाठवण्यात आले होते. काकडे यांची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे मंगळवार पेठेतील नागरिकांनी लोकवर्गणी काढून पैसे जमा केले व किरणच्या उपचारासाठी पाठवले , परंतु उपचारात यश आले नाही व दि . २४ सप्टेंबर २०२२ रोजी पुणे येथे उपचारादरम्यान किरणचा दुर्दैवी मृत्यू झाला .
किरण काकडे च्या मृत्यूस नगरपालिका जबाबदार आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला असून किरण काकडे याच्या घराच्या अवतीभवती अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून , वेळेत उपाययोजना केल्या असत्या तर युवकाचा जीव वाचला असता , त्यामुळे डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या नेतृत्वाखाली नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात दि . २६ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता मोर्चा काढण्यात आला.
यावेळी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देऊन तात्काळ मागण्या पूर्ण करण्यात याव्या अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. आंदोलकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,फलटण नगर परिषद फलटण च्या हलगर्जी पणामुळे एका दलित बौद्ध तरुणाचा मृत्यू झाला असून त्याच्या कुटुंबाची परिस्थिती खूप बिकट आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला नगरपालिके कडून 5 लाख रुपये आणि त्याच्या आईला कंत्राटी बेसवर शिपाई म्हणून नेमणूक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
त्या संदर्भात विशेषबाब म्हणून ऑर्डर काढण्यात यावी आणि पुन्हा किरण काकडे सारखा एखादा तरुण या साथीच्या आजरामुळे मृत्यू होणार नाही त्यासाठी आपल्या नगर पालिकेकडून संपूर्ण मंगळवार पेठ येथे डेंगू रोखण्यासाठी शक्य उपाय योजना राबवण्यात यावी. अन्यथा या पेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन होईल असा इशारा समितीच्या वतीने यावेळी देण्यात आला.यावेळी किरण काकडे याचे कुटुंब व विविध पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.