दहिवडी : ता.०८
माण खटाव विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे आणि माजी आयुक्त तथा राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख हे बारामतीत एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले.
औचित्य होते बारामतीमध्ये राहणाऱ्या माणवासीय बांधवांच्या स्नेहमेळावा आणि माणवासीय भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे. माण-खटावमध्ये राजकीय हाडवैर असलेल्या दोन्ही नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणण्याची किमया साधणाऱ्या बारामतीच्या माणवासीय रहिवासी प्रतिष्ठानचे मात्र सर्वत्र कौतुक होत आहे. एकमेकांच्या विरोधात माण-खटावच्या वैकासिक योगदानाबद्दल बोलताना अनेकदा दोन्ही नेत्यांनी एकमेकांची उणी दुनी काढलेली माण-खटावच्या जनतेने अनेकदा प्रत्यक्ष ऐकली व पाहिली आहेत. मात्र कार्यक्रमाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर दोन्ही नेते एकत्र येण्याचा प्रकार तसा तुरळकच! त्यामुळे आमदार जयकुमार गोरे आणि प्रभाकर देशमुख हे बारामतीतील माणवासीय रहिवासी प्रतिष्ठानच्या एकोप्याच्या कार्यक्रमात एकत्र दिसल्याने चर्चा झाली नसती तरच नवल.!






















