दहिवडी : ता.२२
श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या रणधुमाळीत आमदार जयकुमार गोरे, शेखर गोरे आणि मामूशेठ वीरकर हे तिघे सुनील पोळ यांच्या विरोधात एकत्र आले आहेत. यावरून पोळांना हरवण्यासाठी तिघांनी मेळ केल्याची चर्चा दहिवडीसह माण तालुक्यात चांगलीच रंगली आहे. श्री सिद्धनाथ नागरी पतसंस्थेच्या निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यात होणाऱ्या दुरंगी लढतीसाठी भारतीय जनता पार्टीच्या बॅनरखाली शिवसेना ठाकरे गटाचे शेखरभाऊ गोरे आणि रासपचे मामूशेठ वीरकर असे दोन दिग्गज नेते एकत्र आल्याने सहकार आणि राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.
२२जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत होती. सिद्धनाथ पतसंस्थेच्या एकूण १३ जागांसाठी ७२ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी एकूण ४६ जणांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. गोरे बंधू आणि मामूशेठ विरकर पुरस्कृत पॅनल मधील एकूण १३ तर सुनील पोळ यांच्या पॅनल मधील एकूण १३ जण असे एकूण २६ जण रिंगणात आहेत. सहकार आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत सागर पोळ यांनी आणि अनिल पोळ यांच्यासह अविनाश पोळ यांनी अर्ज माघारी घेतला आहे. भाजप गटाकडे असणारे पोळ यांच्या घरातील सर्वच अर्ज मागे घेण्यात आले आहेत.
यापैकी सर्वसाधारण ०८ जागांसाठी १६ उमेदवार, महिला राखीवच्या ०२ जागांसाठी ०४ उमेदवार, अनुसूचित जाती / जमातीच्या राखीव एका जागेसाठी ०२ उमेदवार, विमुक्त जाती भटक्या जमाती विमाप्र राखीव एका जागेसाठी ०२ तर इतर मागास राखीव प्रवर्गाच्या एका जागेसाठी ०२ असे एकूण १३ जागांसाठी २६ जण आपले नशीब आजमावणार आहेत. उद्या सकाळी सकाळी ११ वाजता उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून चिन्हे वाटप करण्यात येणार आहेत. मतदान ३१ जानेवारी रोजी होईल.