आंधळी धरणात पाणी पोहचल्यानंतर माणमध्ये आनंद
दहिवडी : ता.२२
मागील ४० वर्षात प्रस्थापित लोकांना जे जमलं नाही ते एकट्या जयाभाऊंनी करून दाखवलं आहे, असे विधान आंधळी धरणात पाणी पोहचल्यानंतर दहिवडी नगरपंचायतीचे भाजप पुरस्कृत विद्यमान नगरसेवक रुपेश मोरे यांनी केले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, एकीकडे अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत असतानाच संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर माण तालुक्याच्या जनतेला दुग्धशर्करा योग अनुभवता आला. आमदार जयकुमार गोरेंच्या अथक परिश्रमानंतर अखेर शिरवली येथील बोगद्यातून पाणी आंधळी धरणाकडे सोमवारी सकाळी झेपावले. आमदार जयकुमार गोरेंनी माणच्या जनतेला दिलेला शब्द पाळला असून जनतेमध्ये जयाभाऊ गोरे यांच्याप्रति कृतज्ञतेचे भाव आहेत.
आंधळी धरणात पाणी पोहोचल्यानंतर धरण परिसरातील संपूर्ण क्षेत्र ओलीताखाली येणार आहेत. आंधळी धरण भरून वाहिल्यानंतर माण गंगा नदीकाठच्या गावांना देखील याचा मोठा फायदा होणार आहे. आज जयाभाऊंच्या माध्यमातून आंधळी धरणात पाणी पोहचल्याने शेतकरी समाधानी झाला आहे. शेतकऱ्यांच्या समाधानी प्रतिक्रियांमुळे ‘दिलेला शब्द पाळणारा नेता’ म्हणून आमदार जयकुमार गोरे यांची ओळख तयार झाली असल्याचेही रुपेश मोरे यांनी म्हटले आहे.
चौकट :
माण-खटाव तालुक्यात सध्या टँकर चालू असून लोकांना पाणी टंचाई भेडसावत आहे. त्याच अनुषंगाने आमदार जयकुमार गोरे प्रयत्न करत आहेत.त्यांच्या माध्यमातून आंधळी धरणात पाणी देखील पोहचले आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसचे रणजीत देशमुख आणि राष्ट्रवादीचे प्रभाकर देशमुख हे लोकांच्या प्रश्नांची फिकीर न करता मनोरंजनाचे उपक्रम राबवून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची खरमरीत टीकाही रुपेश मोरे यांनी केली आहे.