महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 30 जुन रोजी देशाला संबोधित केले . यावेळी पंतप्रधान मोदींनी देशातील गरीब नागरिकांसाठी आणि कृषी क्षेत्राच्या दृष्टीने एक मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा म्हणजे पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना आता नोव्हेंबर अखेरपर्यंत वाढविण्यात आली आहे. म्हणजे यापुढे जुलै पासून नोव्हेंबर पर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी जवळजवळ ९० हजार कोटींपेक्षा जास्त पैसे खर्च होणार आहेत. तसंच आता संपूर्ण देशात म्हणजेच ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड’, ‘एक राष्ट्र एक रेशन कार्ड’ची व्यवस्था केली जात आहे. असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदींनी देशातील प्रामाणिक करदात्याचे आणि शेतकऱ्यांचे विशेष आभारही मानले आहेत. या दोन वर्गामुळे देशातील गरीब व्यक्ती एवढ्या मोठ्या संकटाला समर्थपणे तोंड देत असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना जुलै ते नोव्हेंबरपर्यंत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेबाबत बोलताना असं म्हटलं की, ‘कोरोना संकट काळात एक मोठी गोष्ट घडली की, ज्याने संपूर्ण जग आश्चर्यचकित झालं. ती म्हणजे, भारतामध्ये ८० कोटीहून अधिक लोकांना ३ महिन्यांचे रेशन देण्यात आले. म्हणजे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ५ किलो गहू किंवा तांदूळ मोफत देण्यात आला. आज त्यांनी या विषयी एक महत्त्वपूर्ण घोषणाकेली आहे. मुख्यतः पावसाळ्याच्या दरम्यान आणि नंतर आपल्याकडे कृषी क्षेत्रासंबंधी अधिक काम होते . त्यामुळे आता पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत आता दिवाळी आणि छठ पूजेपर्यंत म्हणजे नोव्हेंबर अखेरपर्यंत वाढविण्यात आली आहे. जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यापर्यंत या योजनेचा फायदा घेता येणार आहे. या योजनेच्या विस्तारासाठी ९० हजार कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च होणार आहेत.’
‘अनलॉक १ पासून बेजबाबदारपणा वाढलाय’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला देशातील नागरिकांना खडे बोल देखील सुनावले आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बोलताना नरेंद्र मोदी असे म्हणाले की, ‘लॉकडाऊन दरम्यान आपण नियमांचं योग्य पालन केलं. पण जेव्हापासून आपण अनलॉक १ ची घोषणा केली तेव्हापासून लोकांचा बेजबाबदारपणा वाढला आहे. सार्वजनिक आणि वैयक्तिक जीवनात आपण नियम पाळत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. आता आपण अनलॉक २ मध्ये प्रवेश करत आहोत. अशावेळी आपण लॉकडाऊनमध्ये जसे सतर्क होतो तसंच आताही सतर्क राहण्याची गरज आहे.’ असं मोदी यावेळी म्हणाले.






























