महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सातारा, दि. ९ जुलै : आषाढी एकादशीनिमित्त श्री विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना व भक्तांना राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्याप्रमाणे राज्य शासनातर्फे आनेवाडी टोल नाक्यावर मोफत टोल पासेसचे वाटप सुरू करण्यात आल्याची माहिती भुईंज महामार्ग पोलिस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी ‘ दैनिक महाराष्ट्र न्यज ‘ शी बोलताना दिली. याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये प्रथमच खंड पडला होता. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यामुळे राज्यातील लाखो वारकरी आणि भाविक, भक्त पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी तन आणि मन हरपून वेगवेगळ्या दिंड्यांच्या माध्यमातून तसेच वैयक्तिक स्वरूपामध्ये आपापल्या कुटुंबातर्फे पंढरीच्या दिशेने चालल्याचे विलोभनीय दृश्य सर्वत्र दिसून येत आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या लाखो भाविकांना भक्तांना वारकऱ्यांना हे दर्शन सुलभ व्हावे आणि त्यांच्या खिशाला टोलच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची चाट लागू नये म्हणून राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री शिंदे यांनी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना भक्तांना आणि वारकऱ्यांना टोल माफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन त्याची त्वरित अंमलबजावणी सुरू केल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. राज्य शासनाच्या या निर्णयानुसार आनेवाडी येथील टोल नाक्यावर भुईंज महामार्ग पोलीस केंद्राच्यावतीने भाविकांना भक्तांना आणि वारकऱ्यांना मोफत टोल पासेस चे वाटप करण्यात आल्याची माहिती सपोनी गुरव यांनी दिली.

राज्याचे मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सरकारने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचे विठुरायाच्या भाविकांमधून, भक्तामधून आणि वारकऱ्यांमधून सर्वत्र समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. याप्रसंगी सपोनी गुरव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने या मोफत टोल पासेसचे वाटप आनेवाडी टोल नाक्यावर करण्यात आले.






















