महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी: फलटण
सन 2019 मध्ये ग्राहकांनी जेवढ्या विजेचा वापर केला असेल तेवढेच वीज बिल या वर्षीच्या एप्रिल, मे, जून महिन्यात ग्राहकांना भरायला लागणार आहे. त्यावरील वीज वापराचा भार हा राज्य सरकार उचलणार आहे. तसा प्रस्ताव राज्य शासनाने तयार केला असून युनिट वापरानुसार राज्य सरकार ग्राहकांना दिलासा देणार आहे.या प्रस्तावानुसार राज्यातील सर्वच वीज ग्राहकांची लॉकडाऊन काळातील वीज वापर आणि गेल्यावर्षी म्हणजे 2019 मध्ये केलेल्या वीज वापराची तुलना केली जाणार आहे. उदाहरणार्थ, जर गेल्यावर्षी तुम्हाला १००० रुपये वीज बिल आले असेल आणि यंदा लॉकडाऊन काळात जर 2000 रुपये विजेचे बिल आले असेल, तर तुम्हाला फक्त १००० रुपये भरावे लागणार आहेत.
राज्य सरकार 100 युनिटपर्यंतच्या वीज वापरातील तफावत पूर्णपणे भरणार आहे. म्हणजेच गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात तुम्ही 80 युनिट वीज वापरली असेल आणि यावर्षी 100 युनिट वीज वापराचे बिल आले असेल तर तुम्हाला केवळ 80 युनिटचेच बिल भरायचे आहे. फरकाच्या 20 युनिटचे बिल हे राज्य सरकार भरणार आहे. याच पद्धतीने जर विजेचा वापर 101 ते 300 युनिटपर्यंत असेल तर फरकाच्या वीज वापराच्या 50 टक्के भार हा राज्य सरकार उचलणार आहे. त्याशिवाय जर वीज वापर हा 301 ते 500 युनिटपर्यंत असेल तर फरकाच्या वीज वापराचा 25 टक्के भार राज्य सरकार उचलणार आहे. अशा पद्धतीने राज्यातील सर्वच कंपन्यांच्या वीज ग्राहकांना राज्य सरकार दिलासा देणार आहे.
दरम्यान, लॉकडाऊन काळात ज्यांनी वीज बिल भरलेले असेल, त्या ग्राहकांच्या पुढील बिलातून ही रक्कम वजा केली जाणार आहे. राज्य सरकार केवळ घरगुती वीज ग्राहकांना हा दिलासा देणार आहे. व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी हा निर्णय लागू राहणार नाही. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगितले जात आहे.
































