महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :(पिंपोडे बुद्रुक)
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पिंपोडे बुद्रुक आणि वाठार स्टेशन येथे कोव्हिड सेंटर कार्यरत होण्याची गरज परिसरातील गावातून व्यक्त होत आहे .या बाबत माढा मतदारसंघाचे खासदार निंबाळकर व फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी कोरोना रुग्णासाठी कोविड सेंटर चालू होण्याबाबत प्रयत्न करण्याची मागणी होत आहे .
कोरेगाव तालुक्यात उत्तर भागातील गावामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे . या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना संसर्ग होवू नये यासाठी त्यांना क्वारंटाइन करन्यासाठी कोरेगाव येथे असलेल्या कोव्हिड केंद्रावर रुग्णांना पाठवावे लागते . त्या ठिकाणच्या यंत्रणेवर प्रचंड ताणदिसून येत आहे .कोरेगाव या ठिकाणी रुग्णांना घेवून जाण्यासाठी उपलब्ध असलेल्या यंत्रणेची प्रचंड धावपळ उडत आहे .
तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील आरोग्य विभागाकडून बाधितांना मिळणाऱ्या ऑक्सिजन बेड,व्हेंटिलेटर व इतर सुविधांचा आभाव,प्रशासनावरील वाढता ताण आणि अनेक अशा गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.गेल्या काही दिवसात भागातील अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने,अनेकांच्या जीवावर बेतण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.
त्यामुळे पिंपोडे बुद्रुक व वाठार स्टेशन परिसरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर परिसरातील सोळशी ते पळशी गावापर्यंतच्या रुग्णांच्या सोयीसाठी पिंपोडे बुद्रुक किंवा वाठार स्टेशन येथे कोव्हिड सेंटर सुरु करण्याची गरज व्यक्त होत आहे .त्याच बरोबर याठिकाणी असलेले पिंपोडे ग्रामीण रुग्णालय हे सर्वसामान्य रुग्णासाठी आरोग्य सेवा देणारे एकमेव ठिकाण आहे त्यामुळे पिंपोडे ग्रामीण रुग्णालयाचा या कोविड केंद्रासाठी विचारात घेऊ नये अशी या भागातील लोकांची मागणी आहे.
या परिसरात कोव्हिड सेंटर सुरु करण्याबाबत प्रशासनाने सर्वे करावा आणि कोविड सेंटर लवकरात लवकर कसे सुरू करता येईल याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी या भागातून व्यक्त होत आहे.