कोरेगाव/प्रतिनिधी
शनिवारी दुपारी येथील दौलत चित्र मंदिराच्या प्रांगणात सुनील नंदकुमार घोरपडे वय ३६ याचा लाकडी दंडक्याने मारून निघृण केलेल्या खुनाचा व त्याचा मित्र आनंदा बाळु जाधव यांना केलेल्या गंभीर मारहाणीच्या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणने २४ तासात करून संशयिताला अटक केले. विजय उर्फ दाजीबा संजय नालट वय ३० रा.बुरुडगल्ली कोरेगाव असे त्याचे नाव आहे. दरम्यान आपण दारू पिण्यासाठी पाणी दिले नाही म्हणून मला दोघांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याने आपण रांगापोटी सुनील घोरपडे व आंनदा जाधव यांच्या डोक्यात लाकडी दंडके घालून खून केल्याचे पोलिसांसमोर त्याने कबुली दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी दुपारी ४ वाजता येथील दौलत चित्र मंदिराच्या प्रांगणात दोघेजण जखमी अवस्थेत पडल्याची खबर मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक कदम तसेच इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता सुनील घोरपडे यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. जखमी असलेल्या आनंदा जाधव याला उपचारासाठी पोलिसांनी जिल्हारुग्णालयात पाठविले होते.
दरम्यान पोलिसांनी अधिक चौकशी केली असता मृत सुनील घोरपडे हे सायगाव ता. कोरेगाव येथील असल्याचे समजले होते. पोलिसांनी एकंबे ता.कोरेगाव येथील पोलीस पाटील विकास शिंदे तसेच नातेवाईकांना बोलावून घेतल्यानंतर दोघेही सायगावचे असल्याची ओळख पटली होती. दोघांनी दारूच्या नशेत एकमेकांना मारले असावे अन्यथा तिसऱ्यानेच दोघाना मारहाण केल्याचा अनेकांनी संशय व्यक्त केला होता. सदर घटना बाजार पेठेत घडल्याने पोलीसांसमोर या खुनाची घटना उघड करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. शनिवारी रात्री पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाययक पोलीस उपाअधीक्षक आंचल दलाल यांनी घटनास्थळाला भेट देऊन खुनाचा तपास करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या.
त्यानुसार रविवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,कोरेगाव मधील एका संशयित इसमाने हा गुन्हा केला आहे.त्यामुळे संशयीत विजय उर्फ दाजीबा संजय नालट याच्या अटक करून त्यांचेकडे तपास पथकाने अत्यन्त कौशल्यपूर्ण तपास करत विचारपूस करून संशयितावर प्रश्नांचा भडिमार केला असता त्याने आपण गुन्हा केल्याची कबुली दिली. मी दौलत थिएटरसमोर दारू पिण्यासाठी बसलो असता मला मयत सुनील घोरपडे व जखमी आनंदा जाधव यांनी दारू पिण्यासाठी पाणी मागितले असता मी पाणी दिले नाही म्हणून मला लाथा, बुक्क्यांनी मारहाण केल्याने मला राग आल्याने मी रागाच्या भरात विहिरीजवळ पडलेले लाकडी दांडके आणून दोघांच्याही डोक्यात मारून खून केला आहे.
सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाययक पोलीस उपाअधीक्षक कोरेगाव आंचल दलाल, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा यांचेकडील सपोनि आनंदसिंग साबळे,सपोनि संतोष साळुंखे, पोउनि विशाल कदम, पोलीस हवालदार सुनील बनकर, पों.ना.शरद बेबले,प्रवीण फडतरे, मुनिर मुल्ला,निलेश काटकर,गणेश कापरे,विशाल पवार, विजय सावंत, अमोल सपकाळ, अमोल कणसे, कोरेगाव पोलीस ठाण्याचे गोपनीय विभागाचे किशोर भोसले, अजित पिंगळे,हेमंत शिंदे, समाधान गाढवे,प्रशांत लोहार, अतुल कणसे,महेश जाधव, अजय गुरव,तुषार बाबर आदी पोलिस कारवाईमध्ये सहभाग घेतला