सातारा; सातारा जिल्हयामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे कराड,पाटण,महाबळेश्वर तसेच इतर ठिकाणी मोठया प्रमाणावर पूरस्थितीने घरांचे व शेतीपिकांचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रोटरी क्लब ऑफ मुंबई व्हिजनरीज यांचेवतीने दिनांक १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महाबळेश्वर तालुक्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वितरण करण्यात आले आहे.
रोटरी हे समस्या सोडवणारे एक जागतिक नेटवर्क आहे. साक्षरता आणि शांततेपासून नैसर्गिक आपत्ती, आरोग्यापर्यंत, इतरांना सेवा प्रदान करून प्रोत्साहन देतात. अनेक लोकांचे संस्कार उध्दस्त झाले असून लोक बेघर झालेली आहेत. दैनंदिन मूलभूत गरजांपासून, औषधे, अन्न-धान्य याचा तुटवडा मोठया प्रमाणावर असलेने रोटरी क्लब ऑफ मुंबई व्हिजनरीज यांचेवतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून स्टोव्हसह राशन, गव्हाचा आटा, तेल, मोहरी, हळद, मीठ, प्लेट्स, तसेच चादरी, चटई, LED, महिलांसाठी साड्या, तर लहान मुलांसाठी कपडे, वह्या, पेन इत्यादी जीवनावश्यक साहित्याचे कीट तयार करून महाबळेश्वर तालुक्यामधील घावरी व मालुसर या गावातील बाधितांना वाटप करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
रोटरी क्लब ऑफ मुंबई व्हिजनरीज यांचेवतीने सातारा जिल्ह्यातील पाटण तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या गावातील लोकांना तांदूळ, तुरडाळ, मिनरल वाटर, मेणबत्ती, बेड्शीट, चटई, टॉवेल, सॅनिटरी पॅड, टूथपेस्ट, साबण, डेटॉल, डीडीटी पावडर इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे कीट तयार करून वितरीत केलेले आहे. याव्यतिरिक्त मुंबई पोलिसांसाठी रेनकोटस, आणि कस्तुरबा हॉस्पिटल परेल येथील अपंगांसाठी व्हीलचेअरचे देखील वितरण केलेले आहे.
रोटरी क्लब ऑफ मुंबई व्हिजनरीजच्या अध्यक्ष वैशाली काळे म्हणाल्या, ज्या वेळी अशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती आली आहे, त्या वेळी रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध रूपाने मदत केलेली आहे. सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभते असे यावेळी त्यांनी आवर्जून नमूद केले.
या वेळी पंचायत समिती सभापती संजय गायकवाड, रोटरी क्लब ऑफ मुंबई व्हिजनरीजचे सेक्रेटरी तारीखभाई, क्लब मेंबर शुभम कदम, राकेश शेटे, अनिकेत पवार, वैभव ठाकर, सुनील जाधव, प्रवीण भिलारे, श्रीधर भाडलकर, श्रीमती कल्पना शिंदे आदींनी पुढाकार घेवून पूरग्रस्तांना मदत केली.