पाटण, दि. 10 : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण वीज प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्यासाठी कोयनानगर येथे आलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 1964 सालापासून प्रलंबित असलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची गाऱ्हाणी न ऐकताच वेळेचे कारण सांगून हेलिकॉप्टरने पुण्याकडे प्रयाण केले. त्यामुळे कोयना प्रकल्पग्रस्तांमधून तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला.
कोयनेच्या बाबतीत मुख्यमंत्री एखादी मोठी घोषणा करतील याकडे कोयनावासीयांचे डोळे लागले होते. मात्र या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांची भेट न घेताच केवळ आश्वासनांची खैरात केल्याने ते आले…त्यांनी पाहिले…. आणि ते निघून गेले, अशी चर्चा परिसरात सुरू होती.
कोयना वीज प्रकल्पाच्या पाहणीसाठी आलेले मुख्यमंत्री प्रकल्पाच्या शासकीय विश्रामगृह येथे काही काळ येणार सल्याचे शासकीय यंत्रणेकडून सांगितले जात होते. याठिकाणी कोयना धरण प्रकल्पग्रस्त, विविध संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते. मुख्यमंत्री येणार म्हणून येथे पोलिस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. सकाळी 9 वाजल्या पासून दुपारी दिड वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांची वाट पाहत सर्वजण ताटकळत उभ्या राहिलेल्या यंत्रणेला मुख्यमंत्र्यांनी ठेंगा दाखवत पुण्याकडे प्रयाण केले. मुख्यमंत्र्यांची वाट पाहत राहिलेल्या प्रकल्पग्रस्तांसोबत सर्वांनीच नाराजी व्यक्त केली.
गुरुवार दि. 10 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोयना येथे उतरले. यावेळी त्यांच्या सोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब हे होते. याठिकाणी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खा. श्रीनिवास पाटील, आ. महेश शिंदे, राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार प्रशांत थोरात, सभापती राजाभाऊ शेलार, गटविकास अधिकारी मीना साळुंखे आदींनी स्वागत केले. तदनंतर मुख्यमंत्री व सर्व मंत्रीगण कोयना वीज प्रकल्पाचा चौथा टप्पा पाहण्यासाठी पोफळी, ता. चिपळूण येथे गेले. तेथून ते वीज प्रकल्पाची पहाणी करत थेट कोयना धरणाच्या भिंतीची पहाणी करण्यासाठी आले होते.
तोपर्यंत मुख्यमंत्री विश्रामगगृह येथे येणार म्हणून सकाळपासून कोयना धरणग्रस्त, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते, तसेच इलेक्ट्रॉनिक मिडिया, प्रिंट मिडीयाचे पत्रकार मुख्यमंत्र्यांची वाट पहात ताटकळत उभी होती. कोणी निवेदन देण्यासाठी आले होते. तर कोणी प्रलंबीत राहिलेल्या प्रकल्पग्रस्तांची गाऱ्हाणी मांडण्यासाठी आले होते. या सर्वांनाच चकवा देत मुख्यमंत्री पुण्याच्या दिशेने हेलिकॉप्टरने मार्गस्थ झाले त्यामुळे सर्वांचाच हिरमुड झाला
कोयना धरण व वीज प्रकल्पाच्या पहाणी दौऱ्यानिमित्ताने पाटण तालुक्यात प्रथमच आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या अशा अचानक जाण्याने धरणग्रस्तांची पूर्ण निराशा झाली. गेली 70 वर्षांपासून कोयना प्रकल्पग्रस्तांचे असणारे प्रश्न खुद्द समोरासमोर मुख्यमंत्री त्यांच्या तोंडूनच ऐकतील, त्यावर ठोस काहीतरी निर्णय होईल. तसेच कोयनेबाबत काहीतरी मोठी घोषणा होईल असे प्रकल्पग्रस्तांना वाटले असताना मुख्यमंत्री प्रकल्पग्रस्तांना न भेटताच निघून गेल्याने संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, शेतकरी संघटनेच्या नेत्यांनीही मुख्यमंत्री परस्पर न भेटता निघून गेल्याने काहीकाळ घोषणा बाजी करून आपली नाराजी व्यक्त केली.