ॲड. उदयसिंह पाटील कराड दक्षिण मध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
व्यक्तिकेंद्रित राजकारण हे लोकशाहीसाठी धोक्याचे आहे. मात्र त्याला द्वेषाने विरोध न करता विचाराने विरोध करावा असे, प्रतिपादन रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व जिल्हा परिषद सदस्य ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी व्यक्त केले.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित काँग्रेस प्रणित रयत संघटनेच्या निवडक पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात कोयना दूध संघ खोडशी ता. कराड येथे ते बोलत होते. या मेळाव्यास कराड खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रंगराव थोरात, बाजार समितीचे सभापती महादेव देसाई, माजी सभापती पैलवान जगन्नाथ मोहिते, ज्येष्ठ नेते आप्पासाहेब गरुड, प्रा. धनाजी काटकर, कोयना दूध संघाचे चेअरमन वसंतराव जगदाळे, व्हाईस चेअरमन बापूराव धोकटे यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.उदयसिंह पाटील म्हणाले गत महिन्यात कराड येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रांतिकच्या पक्षश्रेष्ठींच्या पुढाकाराने माजी सहकारमंत्री विलासकाका उंडाळकर व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटांच्या एकीकरणावर पक्षहीत व कार्यकर्त्यांचा विचार करून एकीकरण झाले. पक्षश्रेष्ठींनी पक्षासाठी या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या अनुभव व उपयुक्ततेबद्दल समाधान व्यक्त केले होते.

यापुढे कार्यकर्त्यांनी आता गट या शब्दाला विसरून फक्त काँग्रेसचा विचार प्रामाणिकपणे जोपासावा. तालुक्यातील अनेक गावांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, व त्यानंतर जिल्ह्यातील शिखर संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वांनी मतभेद विसरून सलोख्याच्या रणनीतीने निवडणुका लढल्या पाहिजेत. यावेळी तालुक्यातील विविध गावांतील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व सभासद उपस्थित होते.






























