महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : रहिमतपूर येथील किरोली (वाठार), ता. कोरेगाव येथील ऊस वाहतूकदाराला ऊस तोडणीसाठी मजूर देतो, असे सांगून दोन ऊस टोळी मुकादमांनी 9 लाख 65 हजार रुपयांना गंडा घातला. या घटनेची नोंद रहिमतपूर पोलीस स्टेशनला झाली असून या प्रकरणी पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
गजानन बबन कांबळे व अलका बबन कांबळे, दोघेही रा. सावरगाव (जिरे), ता. जि. वाशीम, अनिल बंडू राठोड (वय 53), अतीष विजय राठोड (वय 35), हरिश्चंद्र तारासिंग पवार (वय 38) सर्व रा. गोस्ता, पोस्ट. रुई, ता. मानोरा, जि. वाशिम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणी ऊस वाहतूकदार हणमंत पंढरीनाथ चव्हाण, रा. किरोली, ता. कोरेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दि. 27 ऑगस्ट ते दि. 28 सप्टेंबर 2020 रोजीच्या दरम्यान टोळी मुकादम गजानन कांबळे व अलका कांबळे या दोघांनी ऊस तोडणीसाठी 11 मजूर देतो म्हणून 4 लाख 65 हजार रुपये रिसोड, जि. वाशिम व रहिमतपूर हद्दीत घेतले. मात्र त्यानंतर वारंवार ऊस तोडणीसाठी मजूर देण्यासाठी विनंती केली असता दोघांनी टोलवाटोलवीची उत्तरे दिली. ऊस तोडणीसाठी मजूर देत नसल्यामुळे घेतलेले पैसे परत देण्याची मागणी केली असता पैसेही दिले नाहीत.
दि. 1 मे ते दि. 20 ऑक्टोबर 2020 या दरम्यान अनिल राठोड, अतिश राठोड व हरिश्चंद्र पवार या तिघांनी संगनमताने ऊस तोडणीसाठी 10 कोयते देतो असे म्हणून ठिकठिकाणी 5 लाख रुपये घेतले. परंतु वारंवार मागणी करून सुद्धा तोडणीसाठी कोयते दिले नाहीत व घेतलेले पैसेही परत दिले नाहीत. फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सावंत करत आहेत.
































