पाटण : राज्यात राबविण्यात येत असलेल्या ई-पिक पाहणी अॅप या कार्यक्रमाची शेतकऱ्यांवर सक्ती न करता पिक पाहणी कार्यक्रम हा शासकीय यंत्रणेमार्फत घेण्यात यावा. ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क व माहितीचा अभाव असल्याने दुर्गम भागातील शेतकरी या पिक पाहणी मध्ये नोंदणी करू शकत नाहीत त्यामुळे भविष्यात ते बऱ्याच गोष्टीपासून वंचित राहू शकतात म्हणून पाटण तालुका शेतकरी संघटना या पिक पाहणी कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचे निवेदन संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, विकास हादवे, बाळासाहेब जगताप,विक्रम देसाई व हणमंत कदम यांनी तहसीलदार योगेश्वर टोंपे यांना दिले.
निवेदनात पुढे असे म्हंटले आहे की,राज्यात सद्यस्थितीत शेतकऱ्यांनी शेतातील ई-पिक पाहणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे या अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेताचा सर्व्हे गट ते एकूण क्षेत्र, पोटखराब क्षेत्र तसेच शेतातील पिके याची माहिती ई-पिक पाहणी सॉफ्टवेअर मध्ये शेतकऱ्यांनी स्वतः भरून व फोटो काढून अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु आजच्या घडीला राज्यातील शेतकरी बांधवांची आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे अनेक शेतकरी कुटुंबामध्ये स्मार्टफोन नाहीत जे काही अॅड्राइड फोन आहेत त्यामध्ये इंटरनेट चा रिचार्ज नाही अशी त्यातच नेटवर्क मिळत नाही अवस्था आहे.
पाटण तालुका हा डोंगराळ व दुर्गम असा आहे आत्ताच महिन्यापूर्वी ढगफुटी सदृश अतिवृष्टीने दरड कोसळून, भूसंख्खलन यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे आणि या गरीब, सामान्य शेतकरी बांधवासाठी ई-पिक पाहणी अॅप डोकेदुखी ठरत आहे.सगळ्यात महत्वाचे म्हणजे या ई-पिक पाहणीची माहिती जर भरली गेली नाही तर ७/१२ वरील पिकांचा तक्ता निरंक राहील परिणामी शेतकरी बांधव पिक कर्ज, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, मिळणारे अनुदान यापासून वंचित राहणार आहे. पिक विम्यामुळे आधीच संकटात असलेल्या ग्रामीण भागातील शेतकरी बांधव या नवीन शासकीय फतव्यामुळे अधिकच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे