पाचगणी : सध्या कबड्डीला सध्या चांगले दिवस आले असून तांबड्या मातीत रुजलेली कबड्डी जपण्याचे काम पांचगणीतील व्यायाम मंडळ करीत आहे. सध्या बदलत्या काळात मँटवरील कबड्डी आकाराला येत असून मँटवरील स्पर्धेसाठी पाचगणी नगरपालिका सर्वोतोपरी मदत करेल, असे आश्वासन पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी दिले आहे.
पांचगणी, ता. महाबळेश्वर येथील व्यायाम मंडळाने आयोजित केलेल्या भव्य जिल्हास्तरीय व हौशी कबड्डी स्पर्धेच्या मैदानाचे फित कापून उद्घाटन नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपूरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे, नगरसेवक नारायण बिरामणे, अनिल वन्ने, हेमा गोळे, उज्वला महाडिक, सुलभा लोखंडे, निसार सय्यद, राजेंद्र भिलारे, नितीन भिलारे, विठ्ठलशेठ गोळे ,प्रवीण भिलारे, बापूसाहेब बिरामणे, गॅब्रियल फर्नांडिस, अजित कासूर्डे, यशवंत पार्टे, विनोद कळंबे, शेखर भिलारे तसेच व्यायाम मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, खेळाडू उपस्थित होते.
नगराध्यक्षा कऱ्हाडकर म्हणाल्या की, पाचगणी शहराचा नावलौकीक व्यायाम मंडळाच्या कबड्डीने सर्वदूर पोहोचला आहे. या मैदानावर खेळलेले खेळाडू निश्चितच राज्य पातळीपर्यंत पोहोचतील असा आपणाला विश्वास वाटतो. या स्पर्धा सात दिवस चालणार असून 35 किलो वजनगटात 35 संघांनी सहभाग नोंदवला आहे. प्रास्ताविक राजेंद्रशेठ राजपूरे यांनी केले संतोष गोळे व प्रमोद पवार यांनी सूत्रसंचालन केले तर अंकुश मालुसरे यांनी आभार मानले.