वनविभाग मात्र सुस्त: शेतकरी संघटना आक्रमक
पाचगणी : हातगेघर धरण क्षेत्रात बाधित झालेल्या कावडी, (ता. जावळी) या गावात बिबट्याने दहशत निर्माण केली असून आज गावातील ऐका शेतकऱ्याची शेळी या बिबट्याने फस्त केल्याने शेतकरी व नागरिक यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक अशी की, कावडी हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसले असून येथील शेतकरी आपली जनावरे डोंगरात चारण्यासाठी नेत असतात. परंतु आज गावातील शंकर धोंडीबा मानकुमरे हे आपल्या शेळ्या चारण्यासाठी डोंगरात गेले होते. यावेळी त्यांची एक बकरी जखमी होवून मृत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बकरीच्या मानेला बिबट्याने चावा घेतला असून ती मृत पणे रानात त्यांना सापडले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तसेच गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रानात गुरे चारण्यास गेल्यावर कुठून तो दृष्टीस पडेल याचा नेम नाही तर गावातील लहान मुले घराबाहेर खेळत असतात हा बिबट्या कधीही गावात येवू शकतो त्यामुळे गावकऱ्यांच्या मनात या बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त वनविभागाने तातडीने करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गेल्या दोन तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये दापवडी येथे सुद्धा बिबट्याचे दर्शन झाले त्यामुळे या संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र वनविभाग मात्र सुस्त आणि बघ्याची भूमिका घेत असल्याने शेतकरी संघटना अधिकच आक्रमक झाली आहे. वन्य जीवांची शिकार झाल्यास वनविभाग अतिदक्षतेने कारवाई करतो मग शेतकऱ्यांची पाळीव गुरे-ढोरे वन्य प्राण्यांनी फस्त केल्यास वनविभाग लगबगीने पुढे का येत नाही ..? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वनविभाग वन्य प्राण्यांची शिकार झाल्यावर जी तत्परता दाखविते. तीच तत्परता वनविभागाने येथे दाखवून या शेतकऱ्याला आर्थिक नुकसानभरपाई द्यावी. आणि बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
































