फलटण प्रतिनिधी श्रीकृष्ण सातव
फलटण : सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांची संघटनेच्या मागणी वरून चौकशी करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिले आहेत.
या प्रकरणाची थोडक्यात माहीती अशी की, जिल्हा परिषद सातारा येथील माध्यमिक विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी राजेश शिरसागर यांनी उत्तरेश्वर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, विडणी, ता. फलटण, जि. सातारा या शाळेमधील अनेक नियमबाह्य मान्यता दिल्याच्या तक्रारी अर्जात नमूद करण्यात आले आहेत. तसेच शून्य बिंदूनामावली (रोस्टर) चे पालन केले नाही. इतर मागास वर्गाची तीन पदे मंजूर असताना चार पदे भरले आहेत. बाळासाहेब खंडेराव वाघमारे, शिक्षण सेवक, अनुसूचित जमाती (एसटी) नसताना एसटी दाखवून मान्यता दिलेली आहे. सेवाज्येष्ठता डावलून मुख्याध्यापकाची मान्यता दिलेली आहे. आर्थिक व्यवहार करून अनियमित मान्यता दिल्याने त्यांच्याविरुद्ध चौकशी करून कारवाई करण्याची मागणी अंगद भोसले, उपाध्यक्ष, छात्र शिक्षण कृती संस्था, पुणे यांनी मा. आयुक्त शिक्षण कार्यालय पुणे यांच्याकडे तक्रार अर्ज 30 जून रोजी दाखल केला आहे. सदर प्रकरणी चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्याबाबतचे निर्देश मा. शिक्षण उपसंचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे शिक्षण कार्यालयाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष टी. एन. सुपे यांना एका पत्राद्वारे दिले आहेत. सुपे यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. त्यानुसार सर्व संबंधितांची सुनावणी घेऊन तसेच वाजवी संधी देऊन चौकशी करून त्याबाबतचे निर्णय निष्कर्ष सह चौकशी अहवाल संचालनालयाला सादर करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी 14 ऑक्टोबर रोजी एका पत्राद्वारे दिले आहेत.