सातारा : केंद्र व राज्य शासनातर्फे विविध योजना सुरू करण्यात येतात. पण यापैकी अनेक योजानांची अंमलबजावणी तितक्या काटेकोरपणे करण्यात येत नाही. त्यामुळे अनेक योजनांचा लाभ हा गरजवंतांना घेताच येत नाही. त्यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली ‘खासदार हेल्थ कार्ड’ ही ज्येष्ठ नागरिकांकरीता वरदान ठरत असलेली योजना अद्यापही सातारा जिल्ह्यात सुरू करण्यात आलेली नाही.या योजनेंतर्गत वयोगट 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा विशेष सवलतीच्या दरात पुरविण्यात येते. सध्या ही योजना नागपूरसह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात सुरू आहे. मग साताऱ्यात ही योजना कधी सुरू करण्यात येणार, जेणे करून या योजनेचा लाभ घेता येईल, अशी विचारणा ही ज्येष्ठ नागरिकांकडून करण्यात येत आहे.या योजनेंतर्गत विशेष सवलतीच्या दरात ज्येष्ठांना औषधी सुविधा, पॅथोलॉजी सुविधा, रेडिओलॉजी सुविधा, डायलीसिस सुविधा, नेत्र, दंत, कान, नाक तपासणी, ऑपेरेशन सुविधा, टेलिमेडिसिन, मानसोपचार, फिजिओ थेरपी, आणि जीर्ण व्याधीवर तज्ञ डॉक्टरांद्वारे योग्य मार्गदर्शन-समुपदेशन करण्यात येते.तसेच ‘वयोश्री’ या योजनेंतर्गत गरजू ज्येष्ठ नागरिकांसाठी निशुल्क चष्मे वाटप, काठी, कर्णयंत्र, एल्बो स्टिक, व्हील चेअर, आदी वाटप तपासणीनंतर, व डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाने देण्यात येते. अत्त्यंत लाभदायी असणारी ही योजना साताऱ्यात ही लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.