दोन्ही पदांवर राष्ट्रवादी विकास आघाडीची बाजी
पाटण : पाटण नगरपंचायत पदाधिकारी निवडीत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पाटण शहर राष्ट्रवादी विकास आघाडीने बाजी मारली. नगराध्यक्षा म्हणून सौ. मंगल शंकर कांबळे व उप नगराध्यक्ष पदावर सागर दादासो पोतदार यांची बिनविरोध निवड झाली.
पाटण नगरपंचायत नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित होते. राष्ट्रवादी तथा पाटणकर गटाच्या पाटण शहर राष्ट्रवादी विकास आघाडीकडे नगरपंचायतीच्या सतरा पैकी तब्बल पंधरा सदस्यांचे बहुमत होते. तर विरोधी शिवसेना तथा राज्याचे गृह राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई गटाकडे अवघ्या दोन नगरसेविका असल्याने नगराध्यक्षा व उप नगराध्यक्ष पाटण विकास आघाडीचाच होणार हे निश्चित होते. बुधवारी नगराध्यक्षा पदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम क्षणी आघाडीच्या सौ.अनिता देवकांत यांनी माघार घेतल्याने सौ. मंगल कांबळे यांची बिनविरोध निवड स्पष्ट झाली व गुरुवारी त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
गुरुवारी नगरपंचायत कार्यालयात पिठासीन अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी सुनील गाढे, पाटण नगरपंचायत मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पूर्ण झाली.
उप नगराध्यक्ष पदासाठी पाटण शहर राष्ट्रवादी विकास आघाडीच्या वतीने सागर दादासो पोतदार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. विरोधी शिवसेना ना. देसाई गटाकडून उप नगराध्यक्ष पदासाठीही कोणाचाही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. छाननीत सागर पोतदार यांचा अर्ज वैध ठरला व यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांचीही निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सुनिल गाढे व अभिषेक परदेशी यांनी अभिनंदन केले.
या निवडीनंतर बोलताना सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, नगरपंचायतीत नव्याने निवडून आलेले सर्वच नगरसेवक, नगरसेविका या पदाधिकारी असून केवळ औपचारिकता म्हणून नगराध्यक्षा, उप नगराध्यक्ष पदांवर या दोघांची निवड झाली आहे. जीवनात प्रत्येकालाच वेगवेगळ्या प्रकारे संधी मिळत असते. मिळालेल्या संधीचा लाभ या नूतन पदाधिकाऱ्यांनी पाटणच्या सर्वांगीण विकासासाठी करावा व पाटणचा नावलौकिक वाढवावा.
नूतन नगराध्यक्षा सौ. मंगल कांबळे म्हणाल्या, आमचे नेते विक्रमसिंह पाटणकर व सत्यजितसिंह पाटणकर यांनी ज्या विश्वासाने माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकली आहे. त्या विश्वासाला पात्र राहून आगामी काळात पाटण शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन.
नूतन उप नगराध्यक्ष सागर पोतदार म्हणाले, सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देणारे आमचे नेते विक्रमसिंह पाटणकर व सत्यजितसिंह पाटणकर यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला एवढे मोठे पद दिले. मी नेत्यांसह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक, हितचिंतकांचा मनापासून ऋणी आहे. पाटणचा नावलौकिक वाढवण्यासाठी माझ्याकडून जे जे शक्य आहे ते करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन.
नूतन पदाधिकाऱ्यांचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, उप सभापती प्रतापराव देसाई, जि. प. माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती राजेश पवार, तालुका दूध संघाचे चेअरमन सुभाषराव पवार, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन बाळासाहेब राजेमहाडिक, माजी चेअरमन दिनकरराव घाडगे, पाटण खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अॅड. अविनाश जानुगडे, कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सोपानराव चव्हाण, सचिव अमरसिंह पाटणकर, बाजार समिती सभापती रेखाताई पाटील आदी मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी अभिनंदन केले.
नूतन पदाधिकार्यांच्या निवडी जाहीर होताच कार्यकर्ते व हितचिंतकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी व घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला.