
सातारा, दि. ७ मार्च : ओझर्डे (ता. वाई) येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक संस्थेतर्फे दिला जाणारा महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कार पाचगणी येथील महात्मा फुले विद्यामंदिर व श्रीमती कांताबेन जे. पी. महेता ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्रीनिवास वाळवेकर यांना देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक संस्थेतर्फे जोशी विहीर येथे आयोजीत करण्यात आलेल्या शानदार सोहळ्यामध्ये सातारा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरच्या प्रशासनाचे सहसचिव डॉ. राजेंद्र शेजवळ, माजी शिक्षण सभापती उत्तमराव माने, जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष उमेश देशमुख आणि संस्थेचे अध्यक्ष सुनील फरांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राचार्य श्रीनिवास वाळवेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्राचार्य वाळवेकर यांनी गेल्या ३५ वर्षाच्या आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्यामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण महर्षी प. पू. डॉ. बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांनी स्थापन केलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित, कोल्हापूर या संस्थेमध्ये अत्यंत निष्ठेने, तन्मयतेने आणि मनापासून शिक्षकी पेशाला सुरुवात करून सध्या प्राचार्य पदापर्यंत पोहोचलेले आहेत. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे आणि संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सध्या ते पाचगणीच्या विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेजचा कार्यभार अतिशय समर्थपणे सांभाळत आहेत. प्राचार्य वाळवेकर यांनी आरएसपी च्या माध्यमातून गेले ३५ वर्षे उत्कृष्ट कार्य केलेले आहे. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे आणि सहकाऱ्यांना बरोबर घेऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे प्राचार्य वाळवेकर हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आजपर्यंत उत्कृष्ट कार्य करू शकले आहेत. त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सामाजिक संस्थेतर्फे देण्यात आलेल्या राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कारामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करण्याची नवी ऊर्जा मिळाली असून यापुढे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजातील सर्वसामान्य घटकापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी अहोरात्र कार्यरत राहणार असल्याची भावना प्राचार्य श्रीनिवास वाळवेकर यांनी दैनिक महाराष्ट्र न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
कार्यक्रमाला प्रा. नराळे, प्रा. राबाडे, प्रा. राऊत, प्रा. राजपूत, प्रा. कदम, अमर वसावे, कलाशिक्षक शिंगण, ग्रंथपाल श्रीमती वैशाली शिंदे, सौ. रेखा वाळवेकर, डॉ. प्रियांजली, रोहित वाळवेकर, सौ. पूजा वाळवेकर व सहकारी उपस्थित होते.






























