महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (अनिल गायकवाड)सातारा, दि. ३१ मार्च : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आल्या की कुस्ती क्षेत्रात चैतन्याचे वारे वाहू लागते. कुस्तीशौकिनांच्या नजरा आखाड्याकडे वळतात. गत महाराष्ट्र केसरी विजेत्यांचे कौतुक आणि चालू वर्षीचा मानकरी कोण? यावर चर्चेला उधाण येते. कोणता मल्ल मैदान गाजविणार, कोणचा गदा उंचविणार, कोणती तालम किताब जिंकण्यासाठी वर्चस्व राखणार यावर पैजा लागणे सुरू होते. स्पर्धा जवळ येताच दिवस-रात्र आखाडे सरावाने घुमू लागतात. महाराष्ट्र केसरी नावाचे हे वलय सार्या मराठी विश्वाला कुस्तीमय करून जाते.महाराष्ट्र केसरी नावाचं वैभव, महाराष्ट्र केसरी नावाचं आकर्षण, महाराष्ट्र केसरी नावाचा रुबाब, महाराष्ट्र केसरी नावाचा आदर, हे सर्वच आगळं-वेगळं. महाराष्ट्रीय माणसाच्या नसा-नसात ‘‘महाराष्ट्र केसरी’’ भिनलेली आहे. महाराष्ट्र केसरी किताब प्राप्त करणार्या कुस्तीगीरास सामाजिक प्रतिष्ठा आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी, विज्ञान अशा विविध क्षेत्रात ज्याप्रमाणे विशेष कार्य करणार्यांचे कौतुक व हयातीपर्यंत सामाजिक प्रतिष्ठा असते. त्याचप्रमाणे हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी मल्लांना प्रतिष्ठा असते. लोक अशा मल्लांना कोणत्याही कार्यक्रमात विशेष सन्मान देतात. कुस्ती क्षेत्रात तर या व्यक्तींना कायमस्वरूपी स्वागत होत असते. सुरूवातीपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि राज्य कुस्तीगीर परिषदेचे अधिवेशन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. पूर्वी जेथे अधिवेशन आयोजित केली जायची, तेथे केसरी स्पर्धा रंगायची. अधिवेशनात महत्त्वाचे ठराव मांडले जायचे, मुख्यमंत्री या ठरावानंतर ठोस आश्वासने दयायचे. मैदानाबाहेर होणार्या अधिवेशनामुळे मैदानातील खेळाचा आलेख उंचावितजायचा.प्रारंभी केसरी पदाला विशेष महत्त्व नव्हते.
अधिवेशनातील एक भाग म्हणून केसरी स्पर्धा होत. गदेपलीकडे अजिंक्यवीराला काहीच प्राप्त होत नसे. यामुळेच पुण्यातील पहिले महाराष्ट्र केसरी रघुनाथ पवार हे नाव अनेकांना माहीत नाही. ८० पूर्वी हौशी व विद्यार्थी गटात स्पर्धा होत असे. जे मल्ल शाळेत जात नसे त्यांचा समावेश हौशी गटात मातीवर खेळायचे. तर जे कुस्तीगीर शाळेत जात ते विद्यार्थी गटात मातीवर खेळायचे. चाळीगावमधील अनिर्णित झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी २० मिनिटांची मातीवर लढत व्हायची. अहमदनगर येथे झालेल्या ८८ च्या अधिवेशनापासून गादीवर अंतिम कुस्ती खेळविण्याची नवी परंपरा सुरू झाली. यावेळी माती की गादी असा वाद अनेक दिवस रंगला. पंरतु महाराट्रातील मल्ल आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॅटच्या कुस्तीत पदके जिंकावीत यासाठी मॅटवर ऑलिम्पिकपूर्वी हौशी व विद्यार्थी गटात स्पर्धा होत असे. २० मिनिटांची कुस्तीची पध्दत बंद करून ३ – ३ मिनिटांच्या २ फे र्या जिंकत सर्वप्रथम गादीवर आंतरराष्ट्रीय नियमानुसार महाराष्ट्र केसरीचा किताब सोलापूरच्या रावसाहेब मगर यांनी पटकविला. तेव्हापासून महाराष्ट्र केसरी स्पर्धेनेही कात टाकली.मैदानावरील स्पर्धा मैदानाबाहेरही आधुनिक बनत गेली. आंतरराष्ट्रीय स्तरावर आता केवळ मॅटवर स्पर्धा खेळविली जाते. तरीही मातीवरील परंपरा जपण्यासाठीच महाराष्ट्र केसरी स्पर्धेला विशेष महत्व आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगर परिषद अनेक स्पर्धा वर्षभर भरविते. मात्र मातीवर असणारी एकमेव स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी स्पर्धा होय. पारंपारिक फ्री स्टाईल पध्दतीने महाराष्ट्र केसरी स्पर्धा होते. गादी आणि मातीवर राज्य स्पर्धा भरवून राष्ट्रीय स्पर्धेत संघ पाठविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.