पाटण प्रतिनिधी: बाळासाहेब देसाई कॉलेज मधील मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. विनायक राऊत यांनी शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर येथून मराठी विषयामध्ये पी.एच.डी पदवी प्राप्त केली आहे. शिवाजी कॉलेज सातारा मराठी विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. कांचन नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आदिवासी कादंबरीचा समाजभाषा वैज्ञानिक अभ्यास’ या विषयावर प्रबंध सादर केला.
सदर प्रबंधासाठी प्रा विनायक राऊत यांना शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, प्रा.डॉ.नंदकुमार मोरे, बाळासाहेब देसाई कॉलेज चे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.पांडुरंग ऐवळे यांचे विशेष मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले.
आदिवासी कादंबरीवरून त्या भागातील बोली भाषा, प्रमाण भाषा याचा अभ्यास तसेच आदिवासी कादंबरीवर आधारित समाजभाषेच्या अभ्यासाच्या चिकित्सेविषयीचा सदर प्रबंध आहे. प्रा.विनायक राऊत यांनी 2011 मध्ये एम.फील. पदवी ही प्राप्त केली असून नैनिताल, जबलपूर व पतियाळा याठिकाणी ओरिएंटेशन कोर्सेस पूर्ण केले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे जवळपास 40 पेक्षा जास्त शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत.प्रा.विनायक राऊत यांना पी.एच डी.पदवी मिळाल्याबद्दल माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर, राष्ट्रवादी चे नेते सत्यजितसिंह पाटणकर, कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सोपानराव चव्हाण, उपाध्यक्ष प्रकाशभाऊ पाटील, जनरल सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर, संचालक संजीवदादा चव्हाण, याज्ञसेन पाटणकर,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.डी.पवार अधीक्षक विजय काटे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवकवर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले.