बाळासाहेब देसाई कॉलेजमध्ये आर्थिक साक्षरतेवर कार्यशाळा संपन्न
पाटण: कोयना शिक्षण संस्था संचलित बाळासाहेब देसाई कॉलेज,पाटण मध्ये आय.क्यू.ए.सी. विभाग व ‘करिअर कट्टा’ या विभागाअंतर्गत ‘आर्थिक साक्षरता व नियोजन’ या विषयावर कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून सेबी चे स्मार्ट ट्रेनर जगदीश माने हे उपस्थित होते तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी.पवार हे होते.तर प्रमुख उपस्थिती म्हणून मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. पांडुरंग ऐवळे व करिअर कट्टा’ चे जिल्हा समन्वयक प्रा. संदीप तडाखे हे उपस्थित होतेकार्यशाळेच्या सुरुवातीला प्रा.संदीप तडाखे यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यशाळेचे स्वरूप व महत्व थोडक्यात सांगितले.त्याच बरोबर प्राध्यापक व विद्यार्थ्यांना भारतीय रोखे बाजाराचा परिचय व्हावा या उद्देशाने सदर कार्यशाळा घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळेचे प्रशिक्षक जगदीश माने यांनी सेबी या संदर्भात कार्यशाळेत सहभागी लोकांना सविस्तर माहिती दिली.तसेच आर्थिक गुंतवणूक कशी करावी,बँकिंग प्रणाली,बँक खात्याचे प्रकार, शेयर बाजाराची माहिती, वयानुसार घेण्यात येणारी जोखीम व शेवटी गुंतवणूकदारांच्या तक्रारी व प्रश्न कसे सोडवावे या सारख्या अनेक बाबींवर सखोल असे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. एस.डी.पवार म्हणाले की,सर्वानीच अगदी सुरुवातीच्या काळापासून गुंतवणुकीची सवय लावून घ्यावी. शेयर बाजाराची व्यवस्थितरीत्या माहिती घेवून गुंतवणूक करावी असे मत त्यांनी व्यक्त केले.शेवटी प्रा.डॉ. प्रशांत फडणीस यांनी आभार मानले. सदर कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी व सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवकवर्ग उपस्थित होते.