स्वातंत्र्यकाळापासून नसलेला रस्ता कसाबसा मंजूर, पण गावातीलच अंतर्गत वाद चव्हाट्यावर.
महाराष्ट्र न्यूज पाटण प्रतिनिधी : स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज तागायत तेटमेवाडी या छोट्याशा गावाला रस्ता नाही.पाटण तालुक्याची सीमारेषा व शिराळा या तालुक्याचा शेजार असूनही या तेटमेवाडी ला रस्ताच नव्हे तर पाणी, लाईट,शाळा अशा अनेक समस्यांचा डोंगर आहे.मुळातच सीमारेषेवरील गावांना दुर्लक्षित केले जाते हे पूर्वापार चालत आलेले आहे. त्याला अपवाद नाही.काळगाव पासून चार ते पाच किलोमीटर डोंगर माथ्यावर वसलेले छोटस गाव? गाव कमीच वस्ती म्हणायला हरकत नाही. गावात जेष्ठ नागरिक सोडले तर सर्व लोक कामानिमित्त मुंबईला स्थायिक. आपला सर्व संसार घेऊन रोजीरोटीसाठी- उपजीविकेसाठी मुंबईला. डोंगर-पठारी दरीचा परिसर असल्याने शेती करणे म्हणजे खूपच जिकिरीचं काम.पाण्याचा कोणताही स्रोत नसल्याने शेती तीही कोरडवाहू. पावसाच्या तालावर. पिण्याच्या पाण्याची ही तीच वानवा.भौगोलिक परिसर प्रतिकूल:त्यात अस्मानी सुलतानी संकटे शहराचा दूरदूर संबंध नाही. पाटण तालुक्याच्या सीमेवर गाव त्यात कोकणची सुरुवात, पावसाचं प्रमाण प्रचंड.तेटमेवाडी आज ही सर्व समस्यांना स्वातंत्र्यानंतरही तोंड देत आहे…सर्व सुख सोयी सुविधांपासून वंचित आहे. या खडतर परिस्थितीमुळे युवा वर्ग मोठ्या प्रमाणात गाव सोडून कामासाठी पुणे-मुंबई चा आधार घेतात.अशा या दुर्लक्षित तेटमेवाडीतील लोकांचा जीवन प्रवास येथून पुढे तरी सुखकर होणार का? असा सवाल यानिमित्ताने निर्माण होतो. विद्यमान आमदार व राज्य मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून इथे रस्ता मंजूर होतो. ग्रामपंचायत सरपंच, सदस्य हे सर्व लोक आपापल्या परीने हळूहळू का होईना प्रयत्न करताना दिसतायत.मात्र त्या सत्कार्याला कुठेतरी गालबोट लावायचं काम याच तेटमेवाडीतील काही समाजकंटक करतायत. वैयक्तिक हेवेदावे समाजकार्याच्या मुद्दाम आढ आणणारी ही जी काही चार ते पाच मंडळी आहेत,यांचा बंदोबस्त सरपंच व त्यांच्या सदस्यांनी याअगोदर केला, पण त्यांना अपयश आले.विद्यमान आमदार शंभूराज देसाई असतील किंवा माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर असतील वारंवार यांना हा वाद सांगितला गेला. पण. आज ज्या पद्धतीने मंजूर रस्त्यावर मोठमोठे दगड मग ते एक माणूस उचलू शकत नाही, तेथे यंत्राच्या साह्यायाने आणून ठेवले जातात.
म्हणजे चांगल्या सत्कार्यासाठी मुद्दाम खोडा घालणाऱ्या या प्रवृत्तींना नक्की काय साध्य करायचे आहे हे देव जाणे. ज्या आया-बहिणींना ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी एका चादरीत किंवा कापडात गुंडाळून खाली चार ते पाच किलोमीटर काळगाव गावात डोंगर कपारीतून करून आणावे लागते,वाटेत जंगली श्वापदांचा त्रास तर वेगळाच पण शिवाय रुग्णांच्या वेदनेचा विचार तर न केलेलाच बरा? म्हणजे ही भयानक भयंकर परिस्थिती असताना मंजूर रस्त्याला विरोध करणे म्हणजे फक्त आणि फक्त द्वेषच. यामुळे आता तेटमेवाडीच्या ग्रामस्थांनी वैतागून तहसीलदार,पोलीस स्टेशन, कलेक्टर, विद्यमान आमदार,माजी मंत्री पाटणकर यांच्यासह सर्व ठिकाणी धाव घेतली, पण अजूनही या समाजविघातक प्रवृत्तीवर अंकुश लागला नाही. शेवटी नाईलाज म्हणून त्यांनी सोशल मीडियावर फेसबुकवर आपली व्यथा मांडली. त्यामुळे आज व दुर्लक्षित असलेले प्रकरण जगासमोर आलं. सार्या पाटण तालुक्यासह जगाला माहित झालं. त्यामुळे विद्यमान आमदार शंभूराजे देसाई, तहसीलदार,कलेक्टर,पोलीस प्रशासन यासह कोर्टाने याची दखल घ्यावी.आजवर कायमच दुर्लक्षित असलेल्या लोकांना न्याय द्यावा.ही मनोभावे अपेक्षा आहात येथील ज्येष्ठ नागरिकांसह नवी पिढी करत आहे.