जेष्ठ नागरिक संघाच्या सभासदांची सातारा दर्शन सहल
प्रतिनिधी अनिल गायकवाड : ऐतिहासिक सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेस असलेल्या आणि श्री समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या परळी येथील सज्जनगडला पुणे येथील आंबेगाव बु II परिसरातील ग्रँड व्ह्यूव ७ जेष्ठ नागरिक संघाच्या सभासद बंधू – भगिनींनी भेट देऊन श्री समर्थ रामदास स्वामींच्या समाधीचे दर्शन घेऊन या परिसरातील विविध धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन निसर्ग सहलीचा आनंद लुटला.
याबाबत अधिक माहिती अशी, पुण्याच्या आंबेगाव बु II परिसरातील ग्रँड व्ह्यूव ७ जेष्ठ नागरिक संघाच्या सभासद बंधू – भगिनींनी सातारा दर्शन निसर्ग सहलीचे आयोजन केले होते. सर्वप्रथम साताऱ्याच्या पोवई नाक्यावरील श्री. छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सर्व सभासद बंधू – भगिनींनी विनम्र अभिवादन करून सातारा दर्शन सहलीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर जेष्ठ नागरिक संघाच्या सर्व सभासद बंधू – भगिनींनी पोवई नाक्यावरीलच चंद्रविलास हॉटेलमधील नाष्ट्याचा आस्वाद घेतला. सातारा येथील बोगद्यातील श्री कुरणेश्वर येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री गणेश आणि श्री दत्त मंदिराला भेट देऊन मनोभावे दर्शन घेतल्यानंतर सर्वजण परळी येथील श्री समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सज्जनगडला जाण्यासाठी सज्ज झाले. जेष्ठ नागरिक संघातील सभासदांचे सरासरी वय ७० ते ७५ वर्षे असतानासुद्धा न दमता, न थकता सर्वजणांनी श्री राम जय राम जय जय राम, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि जय भवानी – जय शिवाजी च्या जयघोषात सज्जनगडावर चढाई करण्यास सुरुवात केली. यावेळी सर्व जेष्ठ नागरिक संघाच्या सभासद बंधू – भगिनींनी उत्साह वेगळाच होता. मजल दर मजल करत सर्वांनी सज्जनगड पादाक्रांत केला. त्यानंतर सर्वांनी मनोभावे श्री समर्थ रामदास स्वामींच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. स्वामींच्या समाधी दर्शनानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सज्जनगडावरून उरमोडी धरणाचे विहंगम दृश्य आणि गडावरील विविध हनुमान मंदिरातील बजरंगबलींचे दर्शन घेऊन त्याच जोमात आणि जोशात सर्वांनी गड उतरला. त्यानंतर सातारा येथील इतिहास प्रसिद्ध राजवाडा, बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील प्रसिद्ध नटराज मंदिर, लिंब येथील इतिहास प्रसिद्ध बारा मोटेची विहीर आणि वाई येथील प्रसिद्ध गणपती मंदिराला भेट देऊन या सातारा दर्शन सहलीचा शेवट करण्यात आला.
या सहलीमध्ये ग्रँड व्ह्यूव ७ जेष्ठ नागरिक संघातील प्रभाकर दौन्डकर, बळीराम धारपुरे, घनश्याम क्षीरसागर, मोहन माने, आदिनाथ कदम, सुधाकर राऊत, शरदचंद्र घाटगे, वसंत साळसकर, पुष्पा धारपुरे, विद्या माने, सुरेखा जोशी, अमृता कदम, जे. र. तावरे, मनीषा पाटील, माया खोत आणि अंजली जोशी हे सभासद सहभागी झाले होते.