लोणंद : मांगल्य शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक कै.आनंदा सुर्यवंशी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था पुणे, संचालित, समता प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय पाडेगाव येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक २८ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत पहिलीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यासाठी वयोगटानुसार निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, मेहदी स्पर्धा व रांगोळी स्पर्धा याचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. तसेच दिनांक ०५ ऑगस्ट रोजी कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या सर्व स्पर्धांचा बक्षीस समारंभ तसेच केसूर्डी येथील डेटवायलर फार्मा प्रा. लि. या कंपनीने सी.एस.आर फंडातून आश्रमशाळेसाठी पाणी शुध्दीकरण मशीन बसविण्यात आले आहे त्याचे उद्घाटन व संस्थेने समता माध्यमिक आश्रमशाळा येथे नव्याने बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही प्रणालीचे उद्घाटन दिनांक ०५ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आले.
यावेळेस कै.आनंदा सुर्यवंशी व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विविध स्पर्धामध्ये प्रथम तीन क्रमांकाने विजयी झालेल्या विद्यार्थ्याना बक्षीस, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील इयता १० वी व १२ वी मध्ये बोर्डाच्या परीक्षेत शाळेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्याचा रोख ५०० रू व गुलाबपुष्प आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोणंद पोलिस स्टेशनचे पी.एस.आय. कय्यूम मुल्ला, ग्रामपंचायत पाडेगावच्या सरपंच सौ अनिता मर्दाने, माजी सरपंच विजय धायगुडे, विनायक एच पी गॅस एजन्सीचे मालक व माजी नगरसेवक हनुमंत शेळके, पाडेगाव ग्रामपंचायत सदस्या जयश्री खुडे, मयूर शिर्के, संस्थेच्या अध्यक्षा सौ.चैत्राली सुर्यवंशी, उपाध्यक्षा श्रीमती विमल सुर्यवंशी, सचिव पवन सुर्यवंशी, प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक बापूराव काकडे, माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक उत्तम माने सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव पवन सुर्यवंशी यांनी केले. या वेळी माजी सरपंच विजय धायगुडे व हनुमंत शेळके-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. विजय धायगुडे यांनी संस्थेची झालेली प्रगती व कै.आनंदा सुर्यवंशी यांच्या कार्याचा गौरव केला. हनुमंत शेळके यांनी संस्थेची सुरुवातीपासून ते आज पर्यंत संस्थेने केलेल्या कार्याचा गौरव केला व संस्था करत असलेल्या कार्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते असे मत व्यक्त केले. मान्यवारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तसेच या स्पर्धेचे परीक्षण करणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार कार्यक्रमामध्ये करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पर्यवेक्षक उत्तम नलवडे यांनी केले.