उंब्रज : प्रतिनिधी–
अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघ भारत सरकार यांच्या आंदोलनास यश आले असून , उंब्रज-पाटण रस्त्यावर पडलेले खड्डे शासनाच्या रस्ते विभागाकडून मुजवण्यात आले आहेत. दि.06/04/2023 रोजी उंब्रज-पाटण रोडवरील खड्ड्यांच्या विरोधात अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघ भारत सरकार यांच्या वतीने रांगोळी काढून , वृक्षारोपण करून आणि प्रशासनाचे डोळे उघडावे म्हणून ढोल वाजवून अनोखे आंदोलन केले होते , 7 दिवसांत रस्त्यावरील खड्डे न मुजावलेस , संबंधित अधिकाऱयांच्या तोंडाला काळे फासून आंदोलनाची धार तीव्र करण्याचा इशारा अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या वतीने दिला होता , याविषयीचे सविस्तर वृत्त दै.महाराष्ट्र ने आपल्या अंकात प्रसिद्ध केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन , शासनाच्या रस्ते विभागाने पहाटे 3 वा. युद्धपातळीवर खड्डे मुजवून तिथे योग्य तो रस्ता केला.तसेच संघाच्या सदस्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून तो रस्ता बनवून घेतला. उंब्रज-पाटण हा गावातील अतिशय रहदारीचा व वर्दळीचा रस्ता असल्याने प्रवाशांना व ग्रामस्थाना खड्ड्यांमुळे खूप त्रास सहन करावा लागत होता , मात्र आज रस्त्याचे झालेले काम पाहून , ग्रामस्थ व प्रवासी यांच्याकडून समाधान व आनंद व्यक्त केला जात होता.
या वेळी अखिल भारतीय मजदूर सेवा संघाच्या पुणे मंडल अध्यक्ष मिनाक्षी पोळ , सामाजिक कार्यकर्ते व महाकाल ग्रुप महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष अरुण कदम , ऑल इंडिया लेबर फेडरेशन चे सातारा जिल्हा अध्यक्ष योगेश पोळ , जिल्हा उपाध्यक्ष दीपक हजारे , अमित कदम , शुभम जाधव हे उपस्थित होते.
































