फलटण प्रतिनिधी : १३ ऑगस्ट २०२३
उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय फलटण यांच्या संयुक्त ध्वजास मानवंदना देताना चक्क हाफ चड्डी व टि शर्ट घालून नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी राष्ट्रीय ध्वज व पर्यायाने देशाचा अपमान केल्याने फलटण सह तालुक्यातून या कृतीचा जाहिर निषेध होत असून संबंधित अधिकाऱ्याच्या तसेच जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.
केंद्र शासनाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार केंद्र शासनाच्या तसेच जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शन सुचना प्राप्त झाल्या. या आदेशानुसार १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी अस्थापना, सहकारी संस्थांच्या कार्यलयावर तिरंगा फडकाविण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर ध्वजाचा मान सन्मान राखण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. परंतु या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार गैरहजर होते.
देशाचा अभिमान प्रत्येकाला असतो भारतीयांनाही आपल्या देशाचा आणि राष्ट्रध्वजाचा अभिमान आहे मात्र या अभिमानामध्ये व अधिकारामुळे कधी कधी तिरंग्याचा अपमान होतो अशीच घटना फलटण येथे घडली असून १३ ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यांची सर्वस्वी जबाबदारी उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार यांची संयुक्त जबाबदारी असताना ध्वजास मानवंदना देताना चक्क हाफ चड्डी व टि शर्ट घालून नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी ध्वजाचा अपमान केल्याची बातमी निदर्शनास आली असून ध्वजसंहिता कायदा व राष्ट्रीय अभिमानाचा अपमान प्रतिबंधक कायदा अंतर्गत कारवाई करत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
राष्ट्रध्वज फडकविण्याबाबत भारतीय ध्वजसंहिता 2002, भारतीय ध्वजसंहिता 2006 नुसार अनेक तरतुदी असून राष्ट्रीय अभिमानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, 1971अंतर्गत ध्वजाचा अपमान व अवमान करणाऱ्या व्यक्तीला 3 वर्षांपर्यंत जेल किंवा दंडात्मक शिक्षा केली जाऊ शकते. ध्वजाचा अपमान करणाऱ्या नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी होत असून आता प्रकरणी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांच्यासह उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार यांच्यावर कोणती कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.