पुसेगाव दि [प्रतिनिधी ] शेती क्षेत्रामध्ये उद्योग आणि व्यवसायाला जी संधी आहे, ती जगात इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये नाही. शेतकऱ्यांनी उत्पादन, प्रक्रिया आणि व्यापार स्वतः केला तर शेतकरी आर्थिक समृद्ध होऊन शेतीला प्रतिष्ठा मिळेल, असा विश्वास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री पवार-फरांदे यांनी व्यक्त केला.
खटाव येथे माजी सरपंच व ज्येष्ठ पत्रकार एम. आर. शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अंबाबाई मंदिर सभागृहात आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप विधाते, लेखक व निर्माता तेजपाल वाघ, कृषीमित्र अरुण अदलिंगे , भूजलतज्ञ विलास भोसले, व्यसनमुक्तीचे किशोर काळोखे, विविध क्षेत्रातील मान्यवर, खटाव तालुका मराठी पत्रकार संघाचे सदस्य, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्या पुढे म्हणाल्या, प्रत्येक गावात शेतकऱ्यांच स्वतःच्या मालकीचं अन्नधान्याच एक तरी गोदाम असलं पाहिजे. तिथं शेतकऱ्यांना स्वतःला शेतमाल साठवता आला पाहिजे. त्यासाठी तारण योजना चालली पाहिजे. जेव्हा जास्त दर असतात तेव्हा शेतमालाची विक्री करता आली पाहिजे. जेणेकरून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होईल. यासाठी शासन प्रयत्नशील असून अनेक योजना देखील राबवित आहे.
कृषीउद्योगाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलत असून या क्षेत्राला कुशल, नवीन संकल्पना राबविणाऱ्या, नवनवीन सुधारणा स्वीकारणाऱ्या आणि उत्पादनासाठी नवे मार्ग शोधणाऱ्या प्रशिक्षित व्यक्तींची गरज आहे. हे मनुष्यबळ युवावर्गाच्या रूपात उपलब्ध होणे ही देखील काळाजी गरज आहे. त्यामुळे शेतीमध्ये तरुण मुले-मुली येत असतील तर पालकांनी त्यांना अडवू नये. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेऊन शेतीच्या विकासात पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. तरच जगाच्या बाजारपेठेत आपण टिकू शकतो.
प्रदिप विधाते यांनी मनोगत व्यक्त करताना एम. आर. शिंदे सरांचे विचार आजच्या आणि पुढील पिढीलाही मार्गदर्शक असल्याचे सांगितले. कार्यक्रमात गावातील उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला बचत गटांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रदीप विधाते, सुत्रसंचालन लेखक व निर्माते तेजपाल वाघ यांनी केले.
कार्यक्रमाला रसुलभाई मुल्ला, मनोज देशमुख, विजयराव बोर्गेपाटील ,आमीन आगा, संजय शहा, जलमित्र प्रकाश जाधव, अँड. एम.ए. काझी ,मोहन घाडगे , प्रा.गंगाराम शिंदे, किशोर कुदळे , बबनराव पाटणकर ,बाबासाहेब इनामदार, राजाराम शिंदे ,प्रा. महेश भदाणे ,नितीन सावंत, प्रल्हाद जगदाळे व अंबाबाई क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
महिलांच्या स्वावलंबत्वाचा गौरव …..
महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध व्यवसाय करुन स्वावलंबनाचे धडे देणाऱ्या महालक्ष्मी महिला बचत गट, युनिक महिला बचत गट, रविशंकरजी महिला बचत गट, मोगरा महिला बचत गट, लक्ष्मी महिला बच गट, एकता महिला बचत गट, स्वामीनी महिला बचत गटांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.