महाराष्ट न्यूज प्रतिनिधी :
देशात पहिल्यांदाच मृत कोरोना रुग्णाचे शवविच्छेदन (पोस्टमॉर्टेम) करण्यात आले. कोरोनामुळे मानवी शरीरावर काय परिणाम होतात हे समजून घेण्यासाठी मृत कोरोना रुग्णाचे पोस्टमॉर्टेम करण्यात आले. आयसीएमआरकडून लेखी परवानगी मिळाल्यानंतर भोपाळच्या एम्समध्ये पोस्टमॉर्टेम झाले.
कोरोनाचा संसर्ग होतो त्यामुळे देशात कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास पोस्टमॉर्टेम टाळत होते. मात्र या धोरणामुळे कोरोना संदर्भात सुरू असलेल्या संशोधनाला अपेक्षित गती मिळत नव्हती. ही बाब लक्षात आल्यामुळे पुरेशी खबरदारी घेऊन पोस्टमॉर्टेम करण्यासाठी परवानगी देण्यात आली. डॉक्टरांनी पीपीई किट घालून देशात पहिल्यांदाच मृत कोरोना रुग्णाचे पोस्टमॉर्टेम केले.
पोस्टमॉर्टेमद्वारे कोरोना झालेल्या व्यक्तीच्या कोणकोणत्या अवयवांवर काय परिणाम झाला हे तपासण्यात आले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोस्टमॉर्टेममुळे कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यात आल्याची माहिती भोपाळच्या एम्सने दिली. पोस्टमॉर्टेमच्या अहवालाची प्रत आयसीएमआरला पाठवण्यात आली. आवश्यकता भासल्यास आणखी काही मृत कोरोना रुग्णांचे पोस्टमॉर्टेम केले जाण्याची शक्यता आहे. मात्र प्रयोगासाठी निवडलेल्या मृतदेहांव्यतिरिक्त इतर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे पोस्टमॉर्टेम टाळून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.