महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :महाबळेश्वर
प्रतापगड मुख्य घाटरस्त्यावर खोल दरीत सुमारे तीनशे फुटांवर तब्बल अठरा तासांहून अधिक काळ अडकलेल्या एका युवकास महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी रविवारी सकाळी सुखरूप बाहेर काढले या युवकाचे नाव अमृत रामचंद्र रांजणे वय ३५ रा दिघी नवी मुंबई असे असून त्याचे मूळ गाव रांजणी ता.जावळी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की,अमृत रांजणे हा युवक दिघी नवीमुंबई येथील एका कंपनीमध्ये कामाला असून तो महाड येथे आपल्या कंपनीच्या सहकाऱ्यांसोबत गेली पाच दिवस कंपनीच्या कामानिमित्त आला होता शनिवारी सुट्टी असल्याने दुपारी अमृत रांजणे हा त्याचे मूळ गाव असलेल्या रांजणी ता जावळी येथे जाण्यासाठी महाड येथून पोलादपूर येथे आला व पोलादपूर येथून एका खासगी ट्रॅक्सने महाबळेश्वरकडे निघाला सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आंबेनळी घाटरस्त्यावर असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी त्याने ट्रक्स थांबविण्यास सांगून तो ट्रॅक्समधून उतरला ज्या ट्रक्सने तो आला ती ट्रक्स तेथून निघून गेली मात्र हा युवक त्या ठिकाणी असलेल्या एका संरक्षक कठड्यावर बराच वेळ बसून होता दरीमध्ये वाकून बघण्याच्या प्रयत्नात त्याचा पाय घसरला व तो थेट झाडाझुडपातून सुमारे तीनशे फूट खोल दरीत घसरत गेला रात्री घाटरस्त्यावर अंधार,धुक्क असल्याने आवाज देऊन देखील त्याला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही मात्र रविवारी सकाळी या ठिकाणी एक पर्यटक दांपत्य ”सेल्फी” घेत होते त्यांना ”वाचवा” ”वाचावा” असा आवाज दरीतून ऐकू आला या दांपत्याने क्षणाचाही विलंब न करता घाटरस्त्यावर असलेल्या फलकावरून महाबळेश्वर पोलिसांशी संपर्क साधला महाबळेश्वर पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेतली याआधी देखील या ठिकाणीचकाही वर्षांपूर्वी एका व्यक्तीला जिवंत वाचविण्यात ट्रेकर्स जवानांना यश आले होते याच ठिकाणी हा व्यक्ती पडल्याचा अंदाज ट्रेकर्सच्या जवानांनी बांधून दोरखंडाच्या साहायाने रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान नगरसेवक कुमार शिंदे,संदीप जांभळे,जयवंत बिरामने,अमित कोळी धाडसाने खाली उतरण्यास सुरुवात केली एकतासांच्या अथक परिश्रमानंतर या युवकास सुमारे तीनशे फूट खोल दरी मधून सुखरूप वर काढण्यास यश आले
महाबळेश्वर ट्रेकर्सचे अध्यक्ष अनिल केळगणे,सुनीलबाबा भाटिया,सुनील वाडकर,दिनेश झाडे,नितीन वाडकर,अनिकेत वागदरे,मनीष झाडे आदीनि मदतकार्यात महत्वाची भूमिका बजावली यावेळी पोलीस उपनिरीक्षक अब्दुल बिद्री,प्रताप लोखंडे,प्रशांत पवार,भुजंग काळे आदी उपस्थित होते या युवकाची पोलिसांनी चौकशी केली असता याने आपण कसे,कोठून आलो,कुठे चाललो होतो याबाबतची माहिती दिली पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधला असून सदर युवकाची मानसिक अवस्था ठीक नसल्याची प्राथमिक माहिती मिळत असून नक्की हा युवक घसरून दरीमध्ये पडला का ? त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला ? याबाबतचा तपास महाबळेश्वर पोलीस करीत आहेत.